संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वनोपजाच्या उत्पन्नातील २० टक्के लाभांशाअंतर्गत ७८ लाखाच्या धनादेशाचे वाटप वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
रामबाग रोपवाटिका विश्रामगृहात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, ताडोबा बफर झोनचे उपसंचालक नरवणे, ताडोबा कोअरचे उपसंचालक सुजय दोदल, विभागीय वन अधिकारी एन.डी.चौधरी, विभागीय वनाधिकारी धाबेकर, विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ट, श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी उपस्थित होते. यावेळी लाभार्थीना ७८ लाखाच्या धनादेशाचे वाटप केले. त्यासाठी चंद्रपूर, मध्यचांदा व ब्रम्हपुरी वन विभागातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते. ही रक्कम ही ग्रामसभेचा ठराव मंजूर करून विविध गावातील व वनातील विकासात्मक कामे स्वयंरोजगार इत्यादीसाठी उपयोगात येणार आहे, तसेच ताडोबातील पुर्नवसन अंतर्गत भगवानपूर, नवेगाव, जामणी, पळसगाव येथे पुर्नवसनाअंतर्गत रस्ते, शाळा, नाली बांधकाम इत्यादी विकासात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा परिषद, समाजकल्याण, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी रामबाग रोपवाटिकेत होस्टेल बांधण्यासाठी भूमिपूजन वनखात्याचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.