मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार असल्यामुळे भविष्यात असा हल्ला झाला तर कमीतकमी जिवितहानी व्हावी, या दिशेने मुंबई पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या दिशेने मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी विभाग स्थापन करण्यात आला असून या विभागाने गेले तीन महिने सतत पाठपुरावा करून शहरातील सुमारे ७८२ ठिकाणे निश्चित केली आहेत. प्रार्थनास्थळे आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये यांसह गर्दीच्या ठिकाणांचा या यादीत समावेश आहे. दहशतवादविरोधी हल्ला परतविण्याची योजना तयार करण्यात येणार असून त्यात खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.
२६/११ च्या हल्ल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर जागे झालेल्या मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीची रचना आखली आहे. समुद्रमार्गे मुंबईत दहशतवादी शिरले. त्यानंतरही समुद्रातून मुंबईकडे येणारी अनेक ठिकाणे आजही पोलिसांच्या देखरेखीखाली नाहीत. समुद्रातील हद्दीचा वाद अद्यापही कायम आहे. गस्तीसाठी नौका उपलब्ध नाहीत. काही नौकांसाठी इंधन नाही, अशी स्थिती असताना आता ही नवी ७८२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणांवर संबंधित पोलीस ठाणी खास लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र दहशतवादविरोधी विभाग स्थापन करण्यात आला आहे.
या प्रकल्पाची सुरुवात डोंगरी-आग्रीपाडा विभागातील परिमंडळातील पोलीस ठाण्यांपासून करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक आणि चार शिपायांना दहशतवादी हल्ल्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून या प्रशिक्षणाला सुरूवात झाल्याचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून ही ठिकाणे निश्चित करून तेथील सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून त्यांनाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योजना तयार करण्यात सांगण्यात आले आहे.
दहशतवादी हल्ला कधीही होऊ शकतो. अशावेळी दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाणाऱ्या यंत्रणेकडे आधीच योजना तयार असावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही कृष्णप्रकाश यांनी सांगितले. दक्षिण मुंबई सर्वाधिक संवेदनाक्षम असल्यामुळे या ठिकाणी जी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित सुरक्षा यंत्रणांशी चर्चा सुरू केली आहे.

Story img Loader