श्रीगोंदे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष हृषीकेश गायकवाड याच्यासह आठजणांना पोलिसांनी जुगार खेळताना अटक केली.  
शहरातील झेंडा चौकात काही प्रतिष्ठित व राजकीय नेते जुगार खेळत असल्याची टीप पोलिसांना कोणीतरी दिली होती. त्यानुसार काल (शुक्रवार) रात्री पोलीस उपनिरीक्षक अंकुश बोराटे यांनी पथकासह या जुगार अड्डय़ावर छापा टाकला. यात मनसेचा तालुकाध्यक्ष हृषीकेश गायकवाड याच्यासह विनोद राऊत, स्वप्नील खोसे, तौसीफ हकीम, युसूफ नदाम, चंद्रशेखर चव्हाण, सुनील माने, विश्वनाथ दांगडे, सतीश पाटील यांना तिरट हा पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले व अटक केली. सतीश पाटील अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या वेळी पोलिसांना मोठी रक्कम मिळाली, पण त्यांनी तपासात १० हजार ७२० रुपयेच दाखवल्याची चर्चा शहरात सुरू होती. दरम्यान, या सर्वांनाही पोलिसांनी अटक करून नंतर लगेच सोडूनही दिले. हाही चर्चेचा विषय बनला आहे.