अतिशय दुर्मिळ असलेल्या माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी वनखात्याने दर महिन्याला माळढोकची गणना कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑगस्टमध्ये गणना झाल्यानंतर १५ व १६ सप्टेंबरला वरोरा तालुक्यात पुन्हा एकदा गणना केली असता पाच माळढोक पक्षी आढळले. दरम्यान, जिल्ह्य़ात प्रत्यक्षात आठ माळढोक पक्षी असल्याची अधिकृत माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
देश-विदेशात माळढोक हा पक्षी अतिशय दुर्मिळ म्हणून ओळखला जातो. विदर्भात केवळ गोंदिया जिल्ह्य़ातील नवेगाव येथे माळढोक पक्षाचे संवर्धन अतिशय चांगल्या पध्दतीने होत आहे. मात्र, इतरत्र हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे. या जिल्ह्य़ातील वरोरा तालुक्यात या पक्षाचे अस्तित्व आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत हा पक्षी नामशेष होत आहे. औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपुरात येत्या काही वर्षांत हा पक्षी बघायलाही मिळणार नाही. त्यामुळे आतापासूनच या पक्षाच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचे निर्देश वनखात्याने दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दर महिन्याला माळढोक गणना कार्यक्रम राबविला जाणार आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात वरोरा तालुक्यात हा कार्यक्रम राबविला तेव्हा सात माळढोक पक्षांची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये १५ व १६ तारखेला हा कार्यक्रम राबविण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे व मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अकरा गट तयार करून ही गणना करण्यात आली. एकूण २५ वन कर्मचाऱ्यांनी माळढोक पक्षाच्या अधिवास क्षेत्रात हा गणना कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पध्दतीने राबविला. यात चार मादी व एक नर माळढोक पक्षी मिळून आला.
वरोरा वनपरिक्षेत्रातील तुलाना, एकोना, गणेश मंदिर, मार्डा, माधोभट्टी शिवार, चरूर खाटी शिवार, शेंबल करंजी शिवार, आर्वी तुमगाव शिवार, आशी खरवड, आष्टी शिवार, वनोजा कैनल व संस्कार भारती परिसर ही गणना करण्यात आली. गेल्या महिन्यात झालेल्या गणनेत सात, तर या महिन्यात झालेल्या गणनेत पाच माळढोक पक्षी दिसून आले. प्रत्यक्षात वरोरा तालुक्यात आठ माळढोक असल्याची माहिती उपवनसंरक्षक एन.डी.चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
वनखात्याच्या निर्देशानुसार किमान वर्षभर ही गणना दर महिन्यात राबविण्यात येणार आहे. माळढोक पक्षाच्या संवर्धनाकडे वनखात्याने विशेष लक्ष दिले असून पक्षांची संख्या वाढविण्यासाठीही विशेष परिश्रम घेतले जात आहेत. कधी काळी वरोरा तालुक्यात माळढोक पक्षांची मोठी संख्या होती. परंतु, औद्योगिक विकासाने ही संख्या रोडावत गेली आहे. आज वरोरा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग सुरू होत असल्याने माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी आता या परिसरात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कडक र्निबध लादण्यात आले आहेत. सोबतच वरोरा हे माळढोक पक्षाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट ठिकाण असल्याचे अभ्यासाअंती सिध्द झाल्याने वनखात्याच्या वतीने माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. सध्या तरी वनखात्याच्या वतीने वरोरा वनपरिक्षेत्रात नियमित उपाययोजना करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी सुरू असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. मात्र, आता दर महिन्यात गणना कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने त्यातून पक्षांची नेमकी स्थिती समोर येणार आहे. पक्षीमित्रांनीही या गणना कार्यक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन वनखात्याने केले आहे.

Story img Loader