उस्मानाबाद जिल्ह्य़ात साखळी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ सहायता निधीतून ८ कोटी उपलब्ध करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे केली. दरम्यान, उस्मानाबाद शहराची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आखलेल्या उजनी ते उस्मानाबाद या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
या ११४ किलोमीटर लांबीच्या योजनेच्या तेरणा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कोनशिलेचे अनावरण शनिवारी चव्हाण यांनी केले. भीमा नदीवरील उजनी धरणापासून उस्मानाबाद शहरापर्यंत आणलेल्या वाढीव पाणीयोजनेला केंद्राच्या योजनेतून अर्थसाह्य़ करण्यात आले आहे. योजनेस १८२ कोटी ९१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या बरोबरच जिल्ह्य़ातील टंचाई स्थिती व त्यावरील उपाययोजनांचा चव्हाण यांनी येथे बैठकीत आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, जि. प.चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, विक्रम काळे व राहुल मोटे, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त गोकुळ मवारे, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास आदी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, राज्यातील टंचाई स्थितीवर विविध उपाय योजण्यासाठी सरकारने मोठी यंत्रणा कार्यान्वित केली असून, राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक खेडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सुमारे साडेआठ लाख जनावरांसाठी चारा-पाण्याची छावण्यांमधून सोय करण्यात आली असल्याचे सांगितले. येत्या खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील पीककर्ज वाटपाबाबत केलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी घेतली. सहकार विभागाने शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या सहकार्याने वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री पवार यांनी टंचाई स्थितीत प्रशासकीय यंत्रणेने सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे. जनावरांच्या छावणीचालकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, असे नमूद केले.
जिल्ह्य़ात सध्या २१५ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, १ हजार १३३ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. छावण्यांमधून २३ हजारांवर जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली आहे. जिल्ह्य़ात १८ हजार १०० मजूर काम करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा