महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या या कारवाईमुळे सत्ताधारी काँग्रेसला हादरा बसला आहे. दरम्यान, या विभागीय आयुक्तांच्या या निकालाविरुध्द राज्य निवडणूक आयोगाकडे व नंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय संबंधित नगरसेवकांनी घेतला आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक म. रफीक हत्तुरे (प्रभाग क्रमांक २६ ब) व देवेंद्र भंडारे (३४ ब) यांच्यासह राजकुमार हंचाटे (१९ अ), संजीव कुलकर्णी (१९ ब), दमयंती भोसले (४ ब), विनोद गायकवाड (४० अ), सुजाता आकेन (४० ब) व परवीन इनामदार (४१ ब) यांचा समावेश आहे. हे सर्व नगरसेवक काँग्रेसचे असून त्यापैकी सहाजण आमदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक समजले जातात. तर एकजण माजी आमदार प्रकाश यलगुवार यांच्या व दुसरा नगरसेवक आमदार दिलीप माने यांच्या गटाचा समजला जातो.
१०२ नगरसेवकांच्या महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसचे सर्वाधिक ४५ नगरसेवक होते. मात्र यापैकी आठजणांना अपात्र ठरविण्यात आल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या घटून ती ३७ इतकी झाली आहे. तथापि, अपात्र नगरसेवकांमुळे काँग्रेस आघाडीच्या सत्तेला कोणताही धोका दिसत नाही. मित्र पक्ष राष्ट्रवादीचे १६ नगरसेवक आहेत. याशिवाय अपक्ष व रिपाइं प्रत्येकी एक याप्रमाणे काँग्रेस आघाडीमागे ५५ नगरसेवकांचे बहुमत शिल्लक आहे. भाजप-२५ व सेना-८ तर बसपा-३ व माकप-३ याप्रमाणे विरोधकांची ताकद आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत महापालिकेची निवडणूक झाली होती. कायद्यानुसार निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी नैसर्गिक न्याय तत्त्वावर चौकशी करून ही कारवाई केली. दरम्यान, भाजपच्या दोन नगरसेवकांचे पदही धोक्यात आले आहे. यात जगदीश पाटील यांचा जातीच्या दाखल्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे, तर याच पक्षाचे दुसरे नगरसेवक अनंत जाधव यांना खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून ते गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या सभांना गैरहजर राहात आहेत.
सोलापुरात आठ नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने काँग्रेसला धक्का
महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
First published on: 23-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 corporator of congress unfit in solapur