स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी झाल्यानंतर हा कर भरणे आवश्यक असताना नोंदणीकृत व्यापाऱ्यांपैकी केवळ २० टक्के व्यापाऱ्यांनीच या कराचा भरणा केला. अजूनही ८० टक्के व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराचा भरणा केलेला नाही. या व्यापाऱ्यांनी दि. १० फेब्रुवारीपर्यंत कराचा भरणा न केल्यास २ टक्के व्याजासह हा भरणा करावा लागेल, असे शुक्रवारी महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
परभणी मनपाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे, की शहरातील काही व्यापाऱ्यांनी अजूनही स्थानिक संस्था कर विभागाकडे नोंदणी केलेली नाही. मुंबई प्रांतिक महापालिका नियम २१०मधील ९ नियमाप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास आपला व्यवसाय तात्काळ बंद करण्यात येईल. ज्या व्यापाऱ्यांनी नोंदणी केली पण स्थानिक संस्था कर भरला नाही, त्यांनी प्रत्येक महिन्याच्या कराचा भरणा पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत करावा. ज्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी नोव्हेंबर २०१२ पासून स्थानिक संस्था कराचा भरणा करणे अपेक्षित होते, त्यांनी तो न भरल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार दोन वर्षांचा कारावास, मालाची जप्ती, कर भरणा न केलेल्या कालावधीच्या प्रत्येक दिवसासाठी शंभर रुपये दंड अशा विविध स्वरूपाच्या कारवाया होऊ शकतात.

Story img Loader