उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्य असल्याने रविवारी सायंकाळपर्यंत धरणात उपयुक्त पाणीसाठा ३६.४५ टक्के इतका वाढल्याचे दिसून आले. धरणात गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पाणीसाठा प्रचंड प्रमाणात घटून वजा ५० टक्क्य़ांपर्यंत गेला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यात हे धरण तब्बल १५० टक्के भरण्याचे आव्हान होते. परंतु सुदैवाने नंतर सुमारे ५० दिवसात वरूणराजाची कृपा व पुणे जिल्ह्य़ातून येणारा पाण्याचा विसर्ग यामुळे या धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे.
धरणातील वजा ५० टक्क्य़ांची पातळी ओलांडत धरणात उपयुक्त पाण्याने ३६ टक्के साठा पार केला आहे. वजा ५० टक्के आणि अधिक ३६.४५ टक्के विचारात घेता आतापर्यंत धरणात १५० टक्क्य़ांपैकी ८६.४५टक्के पाणीसाठा झाला आहे. एकूण ११७ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के तर मृत पाणीसाठा ६३ टक्के असतो. मृतसाठय़ाची पातळी ओलांडून उपयुक्त पाणीसाठा वाढवताना धरणात सध्या एकूण ११७ टीएमसीपैकी ८२ टीएमसी एवढा पाण्याचा साठा आहे. यात उपयुक्त पाण्याचा साठा १८ टीएमसीपर्यंत गेला आहे.
या धरणात सध्या दौंड येथून ४७ हजार १०९ तर बंडगार्डन येथून २४ हजार ४१६ क्युसेक्स विसर्गाने पाणी मिसळत आहे. गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग जवळपास कायम राहिल्याने धरणातील पाण्याची स्थिती झपाटय़ाने बदलत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा