महापालिकेच्या गीता ग्राऊंड अभिन्यासातील भूखंड क्रमांक ५ (आनंद टॉकीज) बांधण्यात आलेल्या इमारतीचा मोबदला म्हणून महापालिकेतर्फे सरोज स्क्रीन कंपनीला ८३.४५ लाख रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या शिवाय कोटय़वधीच्या विकास कामांचे प्रस्तावही बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
सीताबर्डी परिसरात असलेल्या महापालिकेच्या जागेतील एकूम ८२४८ चौ. फूट क्षेत्रफळ असलेला भूखंड मे. सरोज स्क्रीन प्रा. लि. कंपनीला लिजवर देण्यात आला होता. जागेच्या मालकीबाबत मे. सरोज स्किन कंपनी आणि घनश्याम मोहता यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असून या प्रकरणात न्यायालयाने २६ मार्च २०१२ ला अंतिम आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशनुसार महापालिकेने यापूर्वीच जागेचा ताबा घेतला आहे. अर्जदाराने सुरेश टावरी आर्किटेक्ट अ‍ॅन्ड व्हॅल्यूर यांच्याकडून अहवाल तयार करून बांधकामाचे मूल्यांकन ९८.६० लाख रुपये असल्याचे दर्शविले परंतु महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकामाचे मूल्य ८३.४५ लाख रुपये ठरविले असून तेवढाच मोबदला देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  सिव्हिल लाईन्समधील महापालिकेच्या नवीन केंद्रीय कार्यालयातील जागेत उपहारगृह चालविण्यासाठी निविदा बोलविण्यात आली होती. त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. बाबा कॅफे यांनी दरमहा २४ हजार रुपये महापालिकेला देण्याचे मान्य केले आहे त्यामुळे त्यांच्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रस्तावाला समितीमध्ये मंजुरी देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकारातील पद क्रमांक ३४३ अंतर्गत बीएसयूपी घरकुल योजनेतंर्गत महापालिकेच्या सहभागासाठी एकूण ३० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी मागासवर्गीयाच्या राखीव तरतुदीच्या विविध पदांमध्ये एकूण ८ कोटी रुपयाचा निधी वळता करण्याचा प्रस्ताव आहे.
महापालिकेत लागू झालेल्या नव्या कायद्यात दरवर्षीचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला कधी सादर करावे यासंबंधी स्पष्ट उल्लेख नाही. महापालिकेने त्यांच्या सोयीनुसार या तारखा निश्चित करायच्या आहेत. यापूर्वीच्या कायद्यानुसार आयुक्त ५ फेब्रुवारीला अंदाजपत्रक सादर करीत होते, त्या आधारावर ५ फेब्रुवारी किंवा त्या दरम्यान अंदाजपत्रक सादर करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार याच बैठकीत तारीख निश्चितीची शक्यता आहे. स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी ८ सदस्य उद्या, बुधवारी निवृत्त होणार आहे.या रिक्त होणाऱ्या जागांवर नव्या सदस्यांची निवड २ फेब्रुवारीला चिठ्ठी टाकून ठरविण्यात येणार आहे.

Story img Loader