केंद्र सरकारच्या एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमात महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेच्या कामाची सुरूवात आता होणार आहे. त्यासाठी लाभार्थीनी मनपाला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे आवाहन महापौर शीला शिंदे यांनी केले. येत्या वर्षभरात काम पुर्ण होईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
या योजनेतंर्गत घरकुले मिळणाऱ्या लाभार्थीची संयुक्त बैठक महापौर श्रीमती शिंदे यांनी मनपाच्या जुन्या सभागृहात घेतली. लाभार्थ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला व मनपाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले. प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे, प्रकल्प विभागाचे भास्कर घोडके तसेच माजी नगरसेवक अनिल शिंदे यावेळी उपस्थित होते. मेहेत्रे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना प्रास्तविकात योजनेची विस्ताराने माहिती दिली.
मनपाने केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत पहिला टप्पा म्हणून ४८० घरांसाठीचा १३ कोटी २० लाख रूपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. तो मंजूर होऊन मनपाला त्यातील ४ कोटी ८२ लाख रूपयांचे अनुदान प्राप्तही झाले. दुसऱ्या टप्प्यात ३७२ घरांसाठीचा १२ कोटी ३६ लाख रूपयांचा प्रस्ताव दिला होता. तोही मंजूर होऊन त्यातील ४ कोटी १३ लाख रूपयांचे अनुदान मनपाला प्राप्त झाले. मिळालेल्या अनुदानातून लवकरच या योजनांची कामे सुरू होणार आहेत.
या दोन्ही योजनांमध्ये संजयनगर परिसरात २२८ घरकुले व अंगणवाडी बांधण्यात येईल. वारूळाच्या मारूतीजवळ नालेगाव सव्‍‌र्हेक्रमांक २२०/ २२१ येथे २५२ घरकुले व सभागृह बांधण्यात येईल. काटवन खंडोबा मंदिरामागच्या जागेत (नालेगाव सव्‍‌र्हे क्रमांक ४१/२) येथेही ३७२ घरकुले व सभागृह बांधण्यात येणार आहे अशी माहिती मेहेत्रे यांनी दिली. प्रत्येक लाभार्थ्यांला सुमारे २७९ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.
त्यासाठीचा खर्च केंद्र सरकार देणार असले तरी प्रत्येक लाभार्थ्यांला त्याचा हिस्सा द्यावा लागणार आहे. मागसवर्गीय लाभार्थी असेल तर १० हजार रूपये व इतरांसाठी १२ हजार रूपये अशी रक्कम आहे. योजनेतील लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. त्यांची आता छायाचित्रांसहीत ओळखपत्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांने दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन मेहेत्रे यांनी केले.