कर्जत शहराचा समावेश महावितरण कंपनीने आता पैसे न भरणा-या ग्राहकांच्या यादीत जी-३ या गटात केला आहे. त्यामुळे सोमवारपासून शहरात दररोज साडेनऊ तसांची वीजकपात सुरू झाली आहे.  
शहरातील वीज ग्राहकांनी मागील एक वर्षांपासून सतत व्यवस्थित पैसे भरले. त्यामुळे शहरात वीजकपात झाली नाही. यात महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचा-यांचाही मोठा सहभाग होता. आजही तसेच धोरण असताना कर्जत शहराचा समावेश कंपनीने जी-३ या गटामध्ये केला आहे. हा कंपनीचा तळाचा गट आहे. याचा अर्थ त्या भागामध्ये कोणीही वीजबिल भरत नाही. त्यामुळे येथे फक्त कंपनीने कनेक्शन दिले म्हणून वीजपुरवठा करावा असे सूचित करण्यात आले आहे.
सोमवारपासून शहरामध्ये वीजकपात सुरू झाली आहे. रोज पहाटे साडेपाच ते साडेआठ, सकाळी अकरा ते साडेतीन व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत अशी तीन टप्प्यामध्ये साडेनऊ तास वीजकपात करण्यात येते. महावितरणच्या या निर्णयामुळे नियमितपणे वीजबिल भरणा-या ग्राहकांमध्ये मात्र अन्यायाची भावना आहे. अनेकांनी ही नाराजी प्रकट केली.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, की शहरातील नागरिक वीजबिले नियमित भरत आहेत, मात्र वीजगळती व चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वापरलेली वीज व भरलेली बिले यांचे प्रमाण व्यस्त दिसते. ग्राहकांची अडचण करण्यापेक्षा ही गळती कंपनीने थांबवावी अशी नागरिकांकडून होत आहे.  

Story img Loader