गाडीचा ताबा देण्यासाठी १५ दिवस आधी हप्ता भरण्यास पत्र पाठवून वित्तीय कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने कर्जवसुली चालविली. या बाबत दाखल प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने बीड टाटा मोटर्स फायनान्स कंपनीला साडेनऊ हजार रुपये दंड ठोठावला.
जिल्हय़ातील येळंबघाट येथील प्रशांत बाळासाहेब कदम यांनी बीडच्या सानिया मोटर्सकडून २५ मार्च २०११ रोजी इंडिका मोटार खरेदी केली. त्यावर टाटा मोटर्स फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाचा पहिला हप्ता १७ मे २०११ रोजी भरण्यास सांगितले होते. परंतु टाटा मोटर्सने पहिला हप्ता ११ मार्च २०११ रोजी म्हणजे गाडी ताब्यात मिळण्याच्या १५ दिवस आधी भरावा लागेल, असे पत्र कदम यांना पाठवले. टाटा फायनान्सकडून चुकीच्या पद्धतीने वसुली झाली. या प्रकरणी नुकसानभरपाई मिळावी, या साठी तक्रारदाराने अॅड. रवींद्र धांडे यांच्यामार्फत ग्राहक मंचात तक्रार दिली. या तक्रारीनुसार सानिया मोटर्स व टाटा फायनान्स कंपनी मंचापुढे हजर झाले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व कागदपत्रे ग्राहय़ धरून मंचाचे अध्यक्ष विनायक लोंढे, सदस्या मंजूषा चितलांगे यांनी टाटा मोटर्स फायनान्स कंपनी यांनी तक्रारदारास ७ हजार व तक्रारीचे अडीच हजार रुपये अशी ९ हजार ५०० रक्कम देण्याचे आदेश केले.