कासव तस्करी करणाऱ्या नऊ जणांना मसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत निगडी रस्त्यावर अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण शंकर वडू (वय ४५), मारुती पांडुरंग पाटील (वय ६५, दोघेही रा. शिंदेवाडी, ता. कागल), नामदेव उत्तमअप्पा देवकर (वय ४५, रा. मळूंब्रा, ता. तुळजापूर), सचिन नागनाथ चौगुले (वय २२, रा. तळेहिप्परगी ता. दक्षिण सोलापूर), पीरसाहेब आनंद सोनवणे (वय १८, रा. वांगी, ता. दक्षिण सोलापूर), नागनाथ रामचंद्र पवार (वय ३५, रा. सारोळा, ता. तुळजापूर), भरत ज्ञानदेव चव्हाण (वय ३५, रा. तळेहिप्परगी, ता. दक्षिण सोलापूर) अशोक कराप्पा गायकवाड (वय ५८, येळगाव, ता. दक्षिण सोलापूर), भारत जगन्नाथ वाघमारे (वय ३५, रा. ओराळ, ता. मंगळवेढा) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विक्रीच्या उद्देशाने एक कासव घेऊन काही जण मसूर गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार देवकर यांनी याबाबत मसूर पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक आर. एस. चौधरी यांना कळविले. त्यानंतर उपनिरीक्षक चौधरी यांच्यासह हवालदार एस. जे. घाडगे, व्ही. आर. शिंगटे, एस. बी. आवळे, एस. पी. साळुंखे, पी. एस. चव्हाण यांचे पथक मसूर येथे निगडी मार्गावर गेले. त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक रिक्षा (एमएच १२ ६२६७) निगडीच्या दिशेने जाताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी ती गाडी अडविली. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक जिवंत कासव आढळून आले. पोलिसांनी गाडीतील नऊ जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता कासव विक्रीसाठी ते निगडी परिसरात निघाले होते, अशी माहिती उघडकीस आली. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे कासव व रिक्षा जप्त केली. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

Story img Loader