सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटातील ४० जागांसाठी ९० उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून पालिका सभागृहनेते महेश कोठे यांच्यासह माजी महापौर आरीफ शेख व भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जमातीच्या गटातून काँग्रेसच्या कमल कमळे (दक्षिण सोलापूर) तर नगरपालिकेच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून कलावती खंदारे या पाच जणांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा नियोजन समितीची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४० जागांसाठी ९० अर्ज दाखल झाले. महापालिकेच्या ९ जागांपैकी सर्वसाधारण गटाच्या दोन जागांवर महेश कोठे व सुरेश पाटील या दोघांचे तर ओबीसीच्या एका जागेसाठी माजी महापौर आरीफ शेख यांचे एकमेव अर्ज दाखल होते. त्यामुळे त्यांची अविरोध निवड निश्चित झाली आहे. महापौर अलका राठोड यांच्यासह अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा परिषदेच्या २७ जागा असून यात ७ जागा सर्वसाधारण गटातील आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे (करमाळा) याच्यासह सभागृहनेते मकरंद निंबाळकर (बार्शी), सुरेश हसापुरे (दक्षिण सोलापूर), झुंजार भांगे (माढा), शहाजीराव देशमुख (माळशिरस-राष्ट्रवादी), विरोधी पक्षनेते संजय पाटील (बार्शी), महिबूब मुल्ला (अक्कलकोट-काँग्रेस) आदींनी उमेदवारीअर्ज भरले आहेत. तर ओबीसी प्रवर्गातून (४ जागा) बाबासाहेब माळी (पंढरपूर), उमाकांत राठोड (दक्षिण सोलापूर), महिबूब मुल्ला (अक्कलकोट), समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे (माढा) यांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून (७ जागा) अर्ज भरलेल्यांमध्ये सीमा पाटील (मोहोळ), महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड (सांगोला), ज्योती मरतडे (उत्तर सोलापूर), मालती देवकर (करमाळा)आदींचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा