निम्मी रक्कम मनपाकडे वर्ग
महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून होत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी ९० लाख रूपये मंजूर झाले असून त्यातील ४५ लाख रूपये तर मनपाकडे वर्गही करण्यात आले.
नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, सचिन पारखी यांचे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. पाऊलबुद्धे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, तर पारखी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना यासाठी मध्यस्थी घातले. राजकीय मतभेद विसरून एकत्रितपणे काम केले तर त्याला कसे यश मिळते याचा दाखलाच या राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या या दोन युवक नगरसेवकांनी शहरातील समस्त राजकारण्यांना घालून दिला. त्यांना महापौर शीला शिंदे, स्थायी समितीच्या माजी सभापती अनिता राठोड यांचे चांगले सहकार्य मिळाले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सांगण्यावरून पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही स्पर्धा परिक्षा केंद्राचे महत्व ओळखून त्याला तत्काळ मंजुरी दिली.
‘लोकसत्ता’नेच सर्वप्रथम या केंद्राच्या जागेच्या अडचणीला वाचा फोडली होती. सावेडी क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारात सुरू असलेल्या या केंद्रावर त्या जागेत मनपाचे नाटय़ संकुल होणार असल्याने संक्रात येणार होती. ‘लोकसत्ता’ने त्यावर प्रकाश टाकून मनपाचा हा एकमेव चांगला उपक्रम बंद पडू नये यासाठी ‘जिल्हा नियोजनमधून निधी मिळवून मनपाच्याच भूखंडावर त्यासाठी नवी इमारत बांधावी’ असा उपायही सुचवला होता. पाऊलबुद्धे, पारखी यांनी त्याची दखल घेऊन लगेचच महापौर श्रीमती शिंदे, श्रीमती राठोड यांचे लेखी प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाऊलबुद्धे यांनी, तर पारखी यांनी खडसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्याचा परिणाम म्हणून या केंद्राच्या नियोजित इमारतीला वार्षिक योजनेतून ८९ लाख ७९ हजार रूपये मंजूर झाले. उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट पालकमंत्री पाचपुते व जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना दूरध्वनी करून मनपाच्या या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राला निधी देण्याबाबत सांगितले. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन-अडीच महिने शिल्लक असताना हा प्रस्ताव मंजूर होऊन त्यासाठी हा निधी मंजूर झाला. त्यातील ४५ लाख रूपये लगेचच मनपाकडे वर्गही करण्यात आले. मनपाकडे या जागेसाठीचा भूखंड तयार आहे. सावेडी विभागीय कार्यालयालगतच हा भूखंड आहे. त्यामुळे आता त्यावर लगेचच काम सुरू करणे मनपाला सहज शक्य होणार आहे. इमारतीसह सुसज्ज अभ्यासिका, ग्रंथालय, लेक्चर हॉल, संगणक कक्ष, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रसाधन कक्ष, कार्यालय यासहचा हा प्रस्ताव आहे. नेहमीप्रमाणे सुस्त न राहता मनपाने लवकर हालचाल केली तर येत्या वर्षभरात ही इमारत सहज उभी राहून शहरातील हजारो गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.

    मुकुंद संगोराम