जीवनाच्या अंतिम प्रवासासाठी चौघांच्या खांद्यावरून गेलेल्या मिरजेतील ९२ वर्षांची आजी दैव बलवत्तर म्हणून यमदूतालाही वाकुल्या दाखवून स्मशानातून घरी परतल्या. आजीबाईंची प्रकृती चिंताजनक असली तरी गेले ४८ तास त्या स्वतच्या घरी अद्याप सुखरूप आहेत.
मिरजेच्या वखार भाग परिसरात राहणाऱ्या श्रीमती तानुबाई शंकर मोतुगडे (वय ९२) यांना वार्धक्याने अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मुलीची मुलगी स्वत: डॉक्टर असल्याने तिच उपचार करीत होती. मात्र शरीर वैद्यकीय उपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हते. अंतिम क्षणी कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता. बुधवारी रात्री साडेसात वाजता आजीबाईंनी जीवनयात्रा संपविली असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला.
मंगळवारी रात्रीच आजीबाईंना घरी आणून शेवटची अंघोळ घालून अंतिम यात्रेची तयारी केली. मळ्यात त्यांच्यासाठी खड्डा काढण्यात आला. अंधार असल्याने दिवाबत्तीची सोयही करण्यात आली होती. स्मशानभूमीत नेल्यानंतर खड्डय़ात फरशी बसविण्यासाठी काही कालावधीसाठी आजीबाईंना बाजूला ठेवले होते. या वेळी अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांच्या आजीबाई हालचाल करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे स्मशानभूमीतच पुन्हा डॉक्टरांकरवी आजीबाईंची प्रकृती तपासण्यात आली असता त्यांचा श्वासोच्छवास चालू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जाताना खांद्यावरून आणलेल्या आजीबाईंना पुन्हा चार चाकीतून घरी नेण्यात आले. या घटनेला आज ४८ तास झाले. अद्यापही आजीबाई जिवंत असून प्रत्यक्ष यमदूतालाही वाकुल्या दाखवून परतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजीबाई अद्याप कोणाशी बोलत नसल्या, तरी द्रवपदार्थ मात्र तोंडातून स्वीकारत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा