दहावीचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज ‘ऑनलाइन’ जाहीर केला. नगर जिल्हय़ाचा निकाल ९१.८४ टक्के लागला. पुणे विभागाचा निकाल ८८.२५ टक्के लागला. यंदाही जिल्हय़ातील उत्तीर्ण मुलींचे (९२.३० टक्के) प्रमाण मुलांपेक्षा (९१.४८ टक्के) जास्त आहे. सर्वाधिक निकाल पारनेर तालुक्याचा (९५.०१ टक्के) लागला.
दहावीसाठी मार्च २०१३ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल मंडळाने दुपारी ऑनलाइन जाहीर केला. विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेतून निकाल पाहिले, शाळांनीही निकाल दाखवण्याची व्यवस्था केली होती. ६८ हजार २७ परीक्षार्थीनी नावनोंदणी केली होती. त्यातील ६७ हजार ७८६ परीक्षेस बसले. ६२ हजार २५७ (९१.८४ टक्के) जण उत्तीर्ण झाले. १४ हजार ७७ जणांनी विशेष प्रावीण्य मिळवले, २७ हजार ३७९ जणांनी प्रथम वर्ग, १८ हजार ८३८ जणांनी द्वितीय वर्ग तर १ हजार ९६३ जणांनी तृतीय वर्ग मिळवला. जिल्हय़ात ३० हजार १८६ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. पैकी ३० हजार ६७ परीक्षेस बसल्या, २७ हजार ७५२ उत्तीर्ण झाल्या.
शाळांतून, खासगीद्वारे, आयसोलेटेड, सीआयएस अशा विविध मार्गानी एकूण ७२ हजार ७६२ जण परीक्षेस दाखल झाले. त्यातील ६४ हजार ८९ उत्तीर्ण (८८.०८ टक्के) झाले. १४ हजार ९९ जणांनी विशेष प्रावीण्य मिळवले. २७ हजार ५०६ जण प्रथम वर्गात, १९ हजार १५२ जण द्वितीय वर्गात, ३ हजार ३३२ तृतीय वर्गात उत्तीर्ण झाले. जिल्हय़ात दहावीचे वर्ग असलेले एकूण ९३६ शाळा आहेत, त्यातील ११३ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत.
 बारा तालुके ९० टक्क्यांच्या पुढे
सर्वाधिक निकाल पारनेर तालुक्याचा (९५.०१ टक्के) लागला. अन्य ११ तालुक्यांचाही निकाल ९० टक्क्यांच्या पुढे आहे. सर्वात कमी निकाल श्रीरामपूरचा (८६.२५) लागला. इतर तालुक्यांचे निकाल असे : कोपरगावचा- ८८.९५ टक्के, अकोले- ९०.४४, जामखेड- ९३.८१, कर्जत- ९१.५६, नगर- ९२.३५, नेवासे- ९२.१६, पाथर्डी- ९४.३३, राहाता- ९०.४८, राहुरी- ९२.१४, संगमनेर- ९१.८२, शेवगाव- ९३.७९ व श्रीगोंदे- ९३.१४ टक्के असा जिल्हय़ाचा एकूण ९१.८४ टक्के निकाल लागला. जामखेड (९६ टक्के) व पाथर्डीत (९६.३६ टक्के) मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
 

Story img Loader