परभणी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी येत्या खरीप हंगामात ९४० कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट असून बँकांनी ते पूर्ण केले पाहिजे, असे आदेश पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिले.
बी. रघुनाथ सभागृहात आयोजित खरीप हंगामाच्या अग्रणी बँक आढावा बैठकीत ते बोलत होते. जि. प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, आमदार मीराताई रेंगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेशराव रोकडे, जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली असून शेतकऱ्यांना बँकांकडून वेळेवर कर्ज मिळाले तरच त्याचा उपयोग होईल. त्यासाठी बँकांनी आपले उद्दिष्ट ठराविक कालावधीत पूर्ण करून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, अशा सूचना सोळंके यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप पाऊस पडण्यापूर्वी करणे गरजेचे आहे. मेच्या अखेपर्यंत किंवा जास्तीत जास्त जूनच्या १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे आदेश सोळंके यांनी दिले. यावर्षी ९४० कोटींचा कर्जपुरवठा आराखडा तयार केला आहे. पैकी परभणी जिल्हा बँकेला २१५ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाला १३८.४२ कोटी, स्टेट बँक ऑफ हैदराबाद १९९ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. आनंद कारले, डॉ. आनंद गोरे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक एस. एस. गरुडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. जी. जारुंडे आदी उपस्थित होते.