आर्णी येथे आयोजित रोगनिदान व उपचार शिबिराला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थाद्वारा संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, तसेच आर्णी नगर परिषद, आर्णी पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अलीकडेच सुमारे ९४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. विविध रोगग्रस्त सुमारे ११६९ रुग्णांना सावंगी (मेघे) रुग्णालयात पुढील उपचारार्थ टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येणार असल्याची माहिती रोगनिदान शिबिराचे मुख्य आयोजक आमदार शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या ४५ रुग्णांना मुंबईत विशेष रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही मंत्र्यांनी केली. विशेष म्हणजे, महिलांनी मोठय़ा प्रमाणात या शिबिरात सहभागी होऊन तपासणी करून घेतली. गंभीर आजारांमध्ये महिलांचीच संख्या जास्त असल्याचे निष्पन्न झाल्याचे मोघे यांनी स्पष्ट केले. सर्वप्रथम शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते रविवारी शिबिराचे उद्घाटन पार पडले. रोगनिदान शिबिरात सावंगी (मेघे) येथील सुमारे २७ डॉक्टर्स व १८ कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच यवतमाळ येथील डॉ. पोटे, डॉ. चव्हाण, डॉ. भारती यांचे विशेष सहकार्य लाभले, तर आर्णी येथील सर्वच खाजगी डॉक्टर्सनी दिवसभर सेवा दिली. तालुका आरोग्य अधिकारी श्याम शिंदे आपल्या चमूसह ठाण मांडून होते. शिबीर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांचा मोघे यांनी सत्कार व खासदार दत्ता मेघे व उदय मेघे यांनी टीम पाठवून जे शिबिरासाठी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. आर्णी येथील डॉक्टर्स व पत्रकार संघाचाही मोघे यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे आभार मानले.  
याप्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीद बेग, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप राठोड, पंचायत समितीचे सभापती राजू विरखडे, नगराध्यक्ष अनिल आडे, उपनगराध्यक्ष आरीजबेग, बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, उपसभापती विठ्ठल देशमुख, तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी शिबिराला यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरधर कुबडे यांनी केले. आभार नगराध्यक्ष अनिल आडे यांनी मानले.