वेगळ्या विदर्भाच्या बाजूने विक्रमी १ लाख ८६ हजार १९८ लोकांनी मतपेटीच्या माध्यमातून जनमताचा कौल देत वेगळ्या विदर्भ राज्याला भरभरून पाठिंबा दर्शविला आहे. विदर्भाच्या विरोधात केवळ २ हजार ६२४ लोकांनी, तर ३ हजार १०१ होय आणि नाही, अशा दोन्ही बाजूंनी कौल दिला असून १३२ मते अवैध ठरली आहेत. तब्बल ९६.९५ टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भ राज्याला मतपेटीतून पाठिंबा दिल्याने विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी नाही, असे म्हणणाऱ्या केंद्र शासनाला सणसणीत चपराक आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ व विदर्भ राज्य संयुक्त समितीच्या वतीने काल गुरुवारी चंद्रपूर महापालिका क्षेत्रात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. शहरात २४० ठिकाणी मतदान केंद्र लावण्यात आले होते. या मतदान प्रक्रियेत चंद्रपुरातील जनतेने उत्साहाने सहभाग घेतला होता. दरम्यान, येथील एफईएस महाविद्यालयात आज सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातील तब्बल १ लाख ९२ हजार ५५ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. यात विक्रमी १ लाख ८६ हजार १९८ लोकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने मतदान केले, तर विरोधात म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने केवळ २ हजार ६२४ लोकांनी मतदान केले. ३ हजार १०१ लोकांनी होय आणि नाही, अशा दोन्ही बाजूंनी मतदान केले, तर केवळ १३२ मते अवैध ठरली. या मतमोजणीचा निकाल बघता तब्बल ९६.९५ टक्के लोकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने जनमताचा कौल दिला आहे. याचाच अर्थ, विदर्भाची मागणी केवळ नेत्यांची नाही तर लोकांची मागणी असल्याचे मतपेटीने दाखवून दिले आहे. जवळपास १ हजार ३४२ लोकांनी तर मोबाईलवर विदर्भाच्या बाजूने कौल दिला, तर केवळ एकाने विरोधात मतदान केले. मोबाईलवरील मतदानाची टक्केवारी ९९.९३ टक्के आहे.
गेल्या कित्येक वर्षांंपासून वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र, केंद्रातील कॉंग्रेस आघाडीचे सरकार विदर्भाची मागणी ही केवळ काही पडीत नेत्यांची मागणी असल्याचे सांगून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला विरोध करत आहेत. मात्र, १ लाख ८६ हजार १९८ लोकांनी म्हणजेच ९६.९५ टक्के लोकांनी विदर्भाच्या बाजूने मतदान करून असे म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. यावरून चंद्रपूर शहरातील जनता ही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल मतदान झाल्यानंतर सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरू झालेली प्रक्रिया सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत चालली. मतमोजणीसाठी ११ टेबल लावण्यात आले होते. एका टेबलवर २० ते २१ हजार मते मोजण्यात आली. दोन लाख मतपत्रिका मोजण्यासाठी जवळपास साडेआठ तासांचा अवधी लागला. ही मतमोजणी आयुक्त अ‍ॅड. विजय मोगरे, उपायुक्त डॉ.गोपाल मुंधडा, प्राचार्य डॉ.प्रभू चोथवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यासाठी डॉ.अशोक जिवतोडे, संजय बेले, सुधाकर अडबाले, अशोक मुसळे, श्याम धोपटे, प्रा.डॉ.इसादास भडके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे, संगीडवार, गोपाळ सातपुते, जेनेकर, डॉ.मुकूंद देशमुख, रत्नमाला बावणे, डॉ.योगेश दुधपचारे, तसेच जनता महाविद्यालय, एफईएस महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शहरातील ३८ स्वयंसेवी संस्थांचे योगदान मिळाले.

Story img Loader