बदलत्या हवामानामुळे सातत्याने रोगाच्या आहारी जाणारे द्राक्षपीक कसेतरी पक्वतेपर्यंत पोहोचविणा-या कष्टाळू शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर सध्या वटवाघळांनी हल्ला चढविला असून या निशाचर पक्षाच्या तावडीतून द्राक्षांचे संरक्षण कसे करावे याच चिंतेत द्राक्ष बागायतदार आहेत. वड्डी (ता. मिरज), शिंदेवाडी (ता. कवठेमहांकाळ) या ठिकाणी पाच ते सात द्राक्षबागांवर वटवाघळांनी हल्ला चढविला आहे.
वड्डी येथील बाळासाहेब शिंगाणा, महादेव चोकाके, पोपट खोबरे या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागातील तयार मालावर रात्रीच्या वेळी ५०० ते ६०० वटवाघळाची झुंड रोज रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत हल्ला चढवत आहेत. या शिवाय शिंदेवाडी अजित लाठवडे यांच्या ‘कृष्णाशरद’ जातीची एक एकराची द्राक्षबाग पुरती उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
याबाबत श्री. शिंगाणा यांनी सांगितले, की रात्रीच्या अंधारात आलेली झुंड कोणत्याही आवाजाने बागेतून हलत नाही. अगदी फटाके उडविले तरीसुद्ध वटवाघळं हलण्याचे नाव घेत नाहीत. एक एकर बागेला ७ ते ८ मरक्युरी बल्ब लावून उजेड करण्याचा प्रयत्न वटवाघळांना घालविण्यासाठी करण्यात आला. मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. गोफणीतून खडय़ांचा मारा केला तरीसुद्धा हे पक्षी जात नाहीत.
वटवाघळांचे वास्तव्य उंच वाढलेल्या पिंपळ, वड, उंबरसारख्या झाडांवर असते. हा पक्षी दिवसभर झाडाला उलटे टांगून घेणारा आणि रात्रीच्या अंधारातच भक्षासाठी फिरणारा आहे. निशाचर असणा-या या पक्षाचे पिंपळ, वड, उंबर सारखे सहज उपलब्ध होणारे खाद्य आहे. मात्र रस्ता रुंदीकरण, रानातील सावली हटविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे परंपरागत खाद्य उपलब्ध होण्यास निर्माण झालेले अडथळे यामुळे वटवाघळांनी द्राक्ष बागांकडे मोर्चा वळविला आहे. ही झुंड अन्नाच्या शोधासाठी १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून येत असल्याचे आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पक्ष्यांच्या हल्ल्यामुळे द्राक्ष मण्यांत साखर भरण्यापूर्वी माल बेदाण्यासाठी काढावा लागत आहे. परिणामी उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. वन विभाग व कृषी विभागाच्या अधिका-यांनी द्राक्ष बागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहाणी केली आहे. मात्र वटवाघळांपासून द्राक्ष पिकाचे रक्षण कसे करावे, याबाबत कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही. वटवाघळांच्या हल्ल्यामुळे होणारे नुकसान मिळावे यासाठी तहसीलदारांकडे मागणी करण्यात आली. मात्र गावकामगार तलाठी मंडल निरीक्षकांच्या आदेशाशिवाय पाहाणी करण्यास राजी नाहीत असेही श्री. शिंगाणा यांनी सांगितले.
सांगलीत वटवाघळांनी केल्या द्राक्षबागा फस्त
बदलत्या हवामानामुळे सातत्याने रोगाच्या आहारी जाणारे द्राक्षपीक कसेतरी पक्वतेपर्यंत पोहोचविणा-या कष्टाळू शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर सध्या वटवाघळांनी हल्ला चढविला असून या निशाचर पक्षाच्या तावडीतून द्राक्षांचे संरक्षण कसे करावे याच चिंतेत द्राक्ष बागायतदार आहेत.
![सांगलीत वटवाघळांनी केल्या द्राक्षबागा फस्त](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/01/11sng21.jpg?w=1024)
First published on: 18-01-2014 at 03:08 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bat finised off grape plantation in sangli