कधी राजस्थानातला प्रचंड उष्मा तर कधी हिमाचलातला प्रचंड पाऊस, कधी शून्य तापमान तर कधी ४५ डिग्री सेल्सिअस तापमान.. या अशा प्रतिकूल परिस्थितीतही तो न थकता दिवसाला १२५ किमी अंतर कापत होता, तेही सायकलवरून! पनवेलच्या सुमीत परिंगे या तरुणाची ही साहसकथा आहे. जगातील सर्वात उंच लष्करी तळावर डोळ्यात तेल घालून मायभूचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांना अभिवादन म्हणून सुमितने पनवेल ते सियाचेन हा प्रवास सायकलवरून करण्याचे ठरवले. तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सुमीतचे सियाचिन येथे लष्करी तळावर स्वागत करण्यासाठी बेस कमांडर, एअर बेस कमांडर, लेफ्टनंट कर्नल, मेजर असे लष्कराचे एकूण २५ अधिकारी उपस्थित होते. सुमीतने हडपसरच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल फॅकल्टी या विषयात पदवी प्राप्त केली आहे.
रोजचा दिनक्रम
जम्मूपर्यंत दरदिवशी साधारण १२५ किलोमीटर आणि त्यानंतर ७० ते ८० किलोमीटर अंतर सुमीत रोज पार करत होता. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या कॅनंडेल कंपनीच्या सायकलनेही उत्तम साथ दिली. या संपूर्ण प्रवासात मंदिर, धर्मशाळा, आश्रम, लॉजेस आणि आर्मी कॅम्प हे वास्तव्याचे ठिकाण आणि रस्त्यांवरील ढाबे हे खाण्याचे ठिकाण होते.
पहिलाच भारतीय
सियाचेनपर्यंत सायकलने प्रवास करणाऱ्या सुमीतने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पनवेल ते कन्याकुमारी हे १७०० किमीचे अंतरही सायकलने पार केले होते. त्यामुळे देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
१५० किलोमीटर आणि सहा तास
सियाचेन बेस कॅम्पला जाण्यासाठी सामान्य नागरिकांना विशेष परवानगीची आवश्यकता असते. पनामिकच्या पुढे सामान्य नागरिक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या विशेष परवानगीसाठी पनामी ते प्रतापपुरा हा जवळपास १५० किमीचा अतिरिक्त प्रवास सुमीतला करावा लागला. पनामिकमध्ये लष्कराच्या तीन मेजरना भेटण्यासाठी त्याला तब्बल सहा तास वाट पहावी लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा