केंद्रीय वीज मंत्रालयाने महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या क्षेत्रात झालेल्या मूलभूत कामांची नोंद घेऊन महावितरणला ‘अ’ दर्जा दिला आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही घोषणा केली.
देशातील वितरण कंपन्यांच्या कामगिरीच्या आधारे वार्षिक श्रेणी मूल्यांकन पहिल्यांदाच वीज मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. देशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने को-ऑपरेटिव्ह फॉर असिस्टन्स अ‍ॅण्ड रिलिफ एव्हरीव्हेअर(सीएआरई) आणि इन्व्हेस्टमेंट इन्फर्मेशन अ‍ॅण्ड क्रेडिट रेटिंग एजन्सी(आयआयसीआरए) या दोन पतनिर्धारणसंस्थांची मदत घेतली.
या संस्थांनी वीज मंत्रालयाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे देशातील ३९ वितरण कंपन्यांच्या कामगिरीचा अभ्यास करून त्यांची श्रेणी
ठरवली. यात वितरण कंपन्यांची वित्तीय स्थिती, वितरण कंपन्यांच्या लेखाजोख्याचे अंकेक्षण, वितरण क्षेत्रातील सुधारणा, विनियामक प्रक्रियेचे पालन इत्यादी बाबींच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे.
देशात वीज वितरणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महावितरणला ‘अ’ दर्जा देण्यात आला आहे. महावितरणसोबत फक्त पश्चिम बंगालला हा दर्जा मिळाला
आहे.