विविध सुधारणांमुळे विकसित होत असलेल्या सोलापूर रेल्वेस्थानकाला रेल्वे मंत्रालयाने ए-वन वर्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकात आणखी सुधारणा होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
उत्पन्न आणि सोयीसुविधांचे निकष पाहून रेल्वे मंत्रालयाने सोलापूर रेल्वेस्थानकाला ए-वन वर्गाचा दर्जा दिला आहे. रेल्वेस्थानकाचे वार्षिक प्रवासी निव्वळ उत्पन्न साठ कोटींपेक्षा अधिक असावे आणि हे रेल्वेस्थानक बिगर उपनगरीय स्थानक असल्यास अशा स्थानकाला ए-वन वर्गाचा दर्जा मिळतो. सोलापूर रेल्वेस्थानकाने मागील २०११-१२ वर्षांत निव्वळ प्रवासी वार्षिक उत्पन्न ७३ कोटी एवढे मिळविले होते. हे रेल्वेस्थानक बिगर उपनगरीय आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकाला ए-वन वर्गाचा दर्जा मिळाल्याचे सांगण्यात आले.
या वाढीव दर्जामुळे सोलापूर रेल्वेस्थानकावर आणखी सोयीसुविधा उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. यात प्रवास आरक्षण केंद्रावरील खिडक्यांची संख्या सातवरून पंधरापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांसाठी इंटरनेट कॅफेही सुरू होऊ शकेल. याशिवाय अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचा विशेष कक्ष अद्ययावत होणार आहे. फलाट क्रमांक एकवर सुमारे दोन कोटी खर्चाचा एक्सलेटर बांधण्याचा प्रस्ताव आहे. ही विकासकामे येत्या काही महिन्यांत सुरू होणे अपेक्षित असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.