नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याच्या राजकारणातील एक वजनदार माजी मंत्री गणेश नाईक यांचा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पराभव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ऐरोली मतदारसंघातून निवडून आलेले संदीप नाईक यांच्या विजयाचा आनंद एका क्षणात ओसरला. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात थोडी खुशी जादा गम असल्याचे चित्र होते. संदीप नाईक यांना वडील पराभूत झाल्याचे दु:ख लपवता आले नाही.
नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीला वाशी येथील सेक्रेट हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. नवी मुंबई पोलिसांनी कार्यकर्ते, त्यांची वाहने, उभी राहण्याची उत्तम व्यवस्था केल्याने मतदान केंद्राच्या दक्षिण बाजूस कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे जमू लागले होते. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानात सर्व प्रमुख पक्षांसाठी पोलिसांनी लाकडी बांबू लावून बॉक्स तयार केले होते. त्यामुळे कार्यकर्ते एकमेकाजवळ राहण्याचा प्रश्न उद्भवला नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांत चुरस असल्याने या पक्षाचे कार्यकर्ते दोन वेगवेगळ्या बॉक्समध्ये प्रत्येक फेरीच्या घोषणेनंतर जल्लोष करीत असल्याचे चित्र होते. आघाडी घेणाऱ्या उमेदवाराचे कार्यकर्ते घोषणा, शिट्टय़ा, झेंडे फडकवून एकमेकांवर कुरघोडी करीत होते. कधी राष्ट्रवादीचे, तर कधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जोरात जल्लोष सुरू होत असल्याने उमेदवार जणू काही निवडून आल्याचा भास होत होता. या दोन प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांचे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतपतदेखील नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले बॉक्स रिकामे असल्याचे दृश्य होते. भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे या अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि अटीतटीने निवडून आल्या; पण त्यांचा जल्लोष करायला त्या बॉक्समध्ये कार्यकर्ता नव्हता. त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर काही कार्यकर्ते झेंडे घेऊन आले. ऐरोलीचे शिवसेना उमेदवार विजय चौगुले पहिल्यापासून आघाडी घेत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता होती. १३ व्या फेरीपर्यंत चौगुले यांची आघाडी असल्याने शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणात झेंडे आणि फटाकडय़ांची तयारी केली होती. हाच ट्रेड मागील निवडणुकीत होता. ऐरोली उपनगरात चौगुले यांना चांगली मते मिळाली; पण घणसोली, कोपरखैरणे, खैरणे, बोनकोडे, तुर्भे स्टोअर या भागांतील मतदान यंत्राची मोजणी सुरू झाल्यानंतर संदीप नाईक यांचा जीव भांडय़ात पडू लागला. त्या वेळी शिवसैनिकांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी चौगुले यांना मागे टाकून साडेचार हजारांचे मताधिक्य घेतले. त्यानंतर त्यांनी मागे वळून न बघता अंतिम फेरीअखेर साडेआठ हजारांचे मताधिक्य घेतले. त्यामुळे ते विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते; पण तरीही बाहेर मोठय़ा प्रमाणात उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना जल्लोष करण्यावाचून रोखण्यात आले होते, कारण संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांचा निकाल तोपर्यंत हाती आला नव्हता. नाईक त्याच वेळी दोन हजार मतांनी आघाडीवर असल्याची बातमी मतमोजणी केंद्राच्या बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादींच्या जिवात जीव आला. तोपर्यंत शिवसेनेचे विजय नाहाटा आघाडीवर होते; पण २३ फेरीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी या दोन प्रतिस्पध्र्याना मागे टाकून साडेचारशे मतांची आघाडी घेतली. त्या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. शिवसेनेचे उमेदवार प्रतिनिधींनी तर काढता पाय घेतला होता. शेवटी २७ व्या फेरीत म्हात्रे यांनी एक हजार मतांपेक्षा जास्त आघाडी घेतली. या वेळी संदीप नाईक मतमोजणी केंद्रात स्वत: उपस्थित होते.
म्हात्रे यांनी एक हजाराचा टप्पा पार केल्याचे समजताच ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडले. त्याच वेळी नाईक पराभूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. वडिलांच्या पराभवामुळे संदीप नाईक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले. राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज राजकारणी असलेल्या नाईक यांना दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांना आसमान दाखविल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले. या ठिकाणी नाईक-नाहटा अशीच लढत गृहीत धरण्यात आली होती. म्हात्रे यांना तिसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले होते; पण त्यांचा तारू मोदी फॅक्टरमुळे तरल्याची चर्चा होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा