स्त्रियांमध्ये शक्ती असते हे पुरुष केवळ व्यासपीठावरच मान्य करतात, मात्र प्रत्यक्ष आयुष्यात या गोष्टीचा स्वीकार करणारा पुरुष दुर्मिळ आहे, असे मत लेखिका डॉ प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले.
सुर्याश साहित्य मंचातर्फे स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित स्त्री जाणिवांवर आधारित राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सभारंभात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आमदार सुधीर मुनंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार, शोभा पोटदुखे, प्राचार्य डॉ.जावेद शेख, अॅड सुरेश तालेवार, इरफान शेख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, कुठलाही मनुष्य मुळात वाईट नसतो, तर त्याच्यावर झालेले संस्कार, त्याच्या वाटय़ाला आलेली वाईट परिस्थिती यामुळेच मनुष्य वाईट वागतो. अशा वागणुकीपासून मनुष्याला दूर ठेवणे हेच साहित्याचे खरे काम आहे, मात्र पूर्वीसारखे दर्जेदार साहित्य लिहिले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या संस्कृतीत वृक्ष लावणारा, त्याचे संवर्धन करणारा, फळाचा आस्वाद घेणारा वेगवेगळा घटक असतो. मालकी न सांगणारी, अशी आपली संस्कृती आहे. आपल्या अशा संस्कृतीचे जतन स्त्रिया प्राचीन काळापासून करत आल्या आहेत. स्त्रीला निसर्गाने बहाल केलेली सृजनाची शक्ती फार मोठी असून या शक्तीचा स्त्रियांनी अधिकाधिक विकास करावा, असेही त्या म्हणाल्या.
साहित्यिकांची पत्नी आत्मचरित्र लिहिते, मात्र राजकारण्यांच्या पत्नी आत्मचरित्र लिहू शकत नाही. कारण, त्यांच्यावर नैतिकतेच दडपण असते, असा टोलाही यावेळी इंगोले यांनी राजकारण्यांना लगावला. बहिणाबाई, शांता शेळके, इरावती कर्वे यांच्यासारख्या महिला साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्यात आजच्या पिढीला उपयोगी ठरेल, असे टॉनिक आहे, असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. संस्कार देण्याची, जीवन जगण्याची कला, चिंतामुक्त करण्याची कला साहित्यात आहे. साहित्यिकांनी साहित्याची निर्मिती करताना समाजावर त्याचा चांगला परिणाम व्हावा, समाजात एकोपा वाढावा, ही दृष्टी ठेवावी, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक इरफान शेख यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी, तर आभार रश्मी वैरागडे यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा