काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पश्चिम विदर्भात पावसाने सलग दुसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत अमरावती विभागात सरासरी २५.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ७९.५ मि.मी. पाऊस चिखलदरा तालुक्यात झाला. या पावसामुळे धरणांची जलसंचय पातळी वाढली असून मध्यम आणि लघू प्रकल्पांना या पावसाचा फायदा झाला आहे.
गुरुवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांत अमरावती जिल्ह्य़ात ३१.९ मि.मी., बुलढाणा २१.७, अकोला २८.७, वाशीम २३.१ आणि यवतमाळ जिल्ह्य़ात २१.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. पेरणी झालेल्या भागात या पावसाने दिलासा दिला असून काही भागात सलग पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. ४० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये जळगाव जामोद ४५, संग्रामपूर ५८, अकोट ४४.२, तेल्हारा ६८, यवतमाळ ५३, दारव्हा ५२, नेर ५३, चिखलदरा ७९.५, वरूड ४७.७, अंजनगाव सुर्जी ४०.५ मि.मी. या तालुक्यांचा समावेश आहे. या पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढला आहे. अमरावती विभागातील ९ मोठय़ा प्रकल्पांमध्ये ३८.६१ टक्के, २३ मध्यम प्रकल्पांमध्ये ४३.९२ टक्के आणि ३७६ लघू प्रकल्पांमध्ये ४२.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
मध्यम प्रकल्पांपैकी सोनल, अधरपूस हे प्रकल्प तुडुंब भरले असून सोनलमधून १.०१ घनमीटर प्रतिसेंकद पाणी सोडण्यात येत आहे. अधरपूस प्रकल्पाचे दरवाजे ९ सें.मी. उघडण्यात आले असून १९.८२ घमी प्रतिसेकंद सांडवा आहे. विभागात ४२ लघू प्रकल्प १०० टक्के भरले असून मोठय़ा प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्य़ातील पूस प्रकल्प १५ दिवसांपूर्वीच तुडुंब भरला होता. या प्रकल्पातून ४७.८७ घनमीटर प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे.

Story img Loader