शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी तीव्र केली आहे. गेल्या तीन वर्षांत पोलिसांनी तब्बल १ हजारांहून अधिक जणांना शहरातून तडीपार केले आहे. त्यात सहा महिला गुन्हेगारांचाही समावेश आहे.
समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यात कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार तडीपारीची कारवाई केली जाते. ज्या इसमापासून लोकांना भीती वाटत असेल, त्यांच्यापासून धोका निर्माण होत असेल त्यांना कलम ५५ अन्वये, ज्यांनी मालमत्ते संदर्भात गुन्हे केलेले असतील, मारामारी, हत्येचे गुन्हे केलेले असतील त्यांना कलम ५६ अन्वये आणि जे दारू, काळाबाजारासंदर्भात गुन्हे केलेले असतील त्यांना कलम ५७ अन्वये तडीपार केले जाते. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, जिल्ह्य़ातून आणि शहरातून त्याला हद्दपार केले जाते. तडीपारीच्या काळात तो प्रतिबंधित क्षेत्रात पुन्हा दिसला तर त्याच्यावर पुन्हा मुंबई पोलीस कलमाअन्वये अटक करून गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती पोलीस उपायुक्त बालसिंह राजपूत यांनी दिली.
तडीपारी कशी होते..
समाजाला घातक असलेल्या गुन्हेगारांची यादी स्थानिक पोलीस ठाण्यातून पोलीस उपायुक्तांना पाठवली जाते. ते ही यादी पडताळणीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांना पाठवतात. त्यानंतर चौकशी करून अंतिम अहवाल पुन्हा पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. उपायुक्त संबंधित व्यक्तीला बोलावून त्याला बाजू मांडण्याची संधी देतात. त्यानंतरच त्याला तडीपार करायचं की नाही त्याचा निर्णय घेतला जातो. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातून गुन्हेगारांचे उच्चाटन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील टॉप टेन गुन्हेगारांचीही ब्लॅक लिस्ट बनविण्यात येत आहे. तडीपारी अधिक प्रमाणात झाली तर शहरातील गुन्हेगारी कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील, असे पोलिसांनी सांगितले.
शहरातील तडीपार गुंड
वर्ष-       तडीपार गुंड
२०१२      ४२५
२०१३      ४५२ (२ महिला)
२०१४     ४०७ (३ महिला)
२०१५     ९६ (१ महिला)
एकूण तडीपार- १३८०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा