गेल्या दहा दिवसांपासून पावसाची अखंड रिपरिप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाची धास्ती घेतली आहे. सोयाबीनवरील रोगाचे प्रमाण वाढण्याबरोबरच पानेही पिवळी पडू लागल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहेत.
प्रारंभी पेरणीयोग्य पाऊस पडतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना होती. ती चिंता दूर झाल्यानंतर उघडीप दिली तर पिकांची वाढ कशी होईल? याची चिंता होती आता गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला भीज पाऊस थांबत नसल्यामुळे सूर्याचे दर्शनच नाही. पिकांना सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बंद पडल्यामुळे पाने पिवळी पडत आहेत. आणखीन काही दिवस पाऊस थांबला नाही तर पिकाची वाढ होणे दुरापास्त होऊन ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे फवारणीही करता येत नाही. त्यामुळे ‘कळत असूनही वळत नाही’ अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सोमवारी पहाटेपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता. मंगळवार, २३ जुलपर्यंतच जिल्हय़ाच्या वार्षकि सरासरीच्या ५३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्हय़ाची वार्षकि सरासरी ८०२ मि. मी. असून मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी ४३ मि. मी. पाऊस झाला व त्यामुळे एकूण पाऊस ४२५ मि. मी. इतका झाला आहे.
तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे- कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर ४६ (३७५), औसा ४७ (३१६), रेणापूर ४३ (४००), उदगीर ४२ (४६२), अहमदपूर ३८ (४९५), चाकूर ३५ (४२१), जळकोट ३४ (४९३), निलंगा ५१ (४०७), देवणी ४४ (४७०), शिरूर अनंतपाळ ४८ (४०९).
विष्णुपुरीचे दोन दरवाजे उघडले;
लोहा-गंगाखेड मार्गावरील
वाहतूक बंद, वृद्धेचा मृत्यू
वार्ताहर, नांदेड
जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून किनवट व माहूर तालुक्यांत जोरदार वृष्टी होत असून किनवट, माहूर व हिमायतनगर या ३ तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोहा-गंगाखेड रस्त्यावरील वाहतूक बंद पडली. मांडवी परिसरात वृद्धा वाहून गेली.
गोदावरी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून, नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून २४२ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्याने गोदावरी नदीने अजून धोक्याची पातळी गाठली नसली तरी विदर्भातील अतिवृष्टी व किनवट-माहूर परिसरात संततधार यामुळे पनगंगा नदीला पूर आला. वझरा (तालुका माहूर) येथील कलावती नारायण कुकलवार (वय ८५) ही वृद्धा आपल्या मुलीला भेटावयास दरसांगवी येथे जात होती. गेल्या १९ जुलैस ती निघाली होती, मंगळवारी तिचा मृतदेह सापडला.
इसापूर धरण ८० टक्के भरल्याने अधिकाऱ्यांनी धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी सुरू केली. मात्र, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पनगंगा दुथडी भरून वाहत आहे. किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्यांत अनेक शेतांमध्ये पाणी शिरले. जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इसापूर धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात, असे संकेत प्राप्त झाल्यानंतर किनवट, माहूर, हिमायतनगर या तालुक्यांना सतर्कतेचे आदेश बजावले आहेत.
पावसामुळे गंगाखेड-लोहा, किनवट-नांदेड वाहतूकही बंद झाली आहे. नांदेड-इस्लापूर रस्त्यावरील बुरकूल वाडीजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. किनवटजवळ कोठारी पुलावरून पाणी वाहत असल्याने शनिवार पेठ, मदनापूर, दरसांगवी या गावांचा, तसेच मांडवा नाल्याला पूर आल्याने मांडवा-बेल्लोरी-नागझरी-वंजारवाडी-झेंडीगुंडा-घोगरवाडी-िपपळगाव या गावचा संपर्क तुटला. किनवट-माहूर तालुक्यांत २९ गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हिंगोलीत सर्वाधिक वृष्टी,
अनेक कुटुंबांना हलविले
वार्ताहर, हिंगोली
सोमवारी दिवसभर रिमझिम स्वरूपात पडणाऱ्या पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. मंगळवारीही दुपारी चापर्यंत जिल्ह्य़ास झोडपून काढले. जिल्ह्य़ात आतापर्यंत ६७.४६ टक्के पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात सर्वाधिक पाऊस हिंगोलीत नोंदविला गेला. कयाधू नदीला पूर आल्यामुळे शहराच्या आझम कॉलनीतील ३५, बावनखोली येथे पाणी शिरल्याने १५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
जिल्ह्य़ातून पेनगंगा, कयाधू व पूर्णा या तीन मुख्य नद्या वाहतात. पेनगंगातील पाण्याचा प्रवाह वाढत असून नदीकाठच्या कन्हेरगाव नाका येथील पुराचे पाणी वाढत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कयाधूच्या पुरामुळे डोंगरगाव पूल येथील जुन्या पुलावरून पाणी वाहात आहे. शेवाळा, कोंढूर, सोडेगाव, पिंपरी (धांडे), देवजना, चिखली या कळमनुरी तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला. बिबथरच्या ग्रामस्थांना इतरत्र हलविण्यात आले. सेनगाव तालुक्यातील वायचळ पिंपरी गावात पाणी शिरल्याने १० कुटुंबीयांना इतरत्र हलविले. नरसी नामदेव मंदिरापर्यंत कयाधू नदीचे पाणी आले आहे. शेतात सर्वत्र शेततळ्यांचे स्वरूप आले असून पिकांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची सकाळी ८ वाजता घेतलेली नोंद मिमीमध्ये, कंसामध्ये आतापर्यंत पडलेला पाऊस – हिंगोली ४९.१४(६३६), वसमत २७.५७ (५७४.०१), कळमनुरी ३७.५० (५५६.३९), औंढा नागनाथ २९.७५ (६९१.८७), सेनगाव २९.८३ (५२०.०८).
परभणीत जोर कायम, पिकांची वाढ खुंटली
वार्ताहर, परभणी
जिल्ह्य़ात सोमवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा मंगळवारीही जोर कायम होता. सध्याचा पाऊस पिकांसाठी मात्र धोक्याचा ठरत असून पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पाण्याचा निचरा होत नसलेल्या भागातील पिके पावसामुळे पिवळी पडत चालली आहेत.
मंगळवारी दिवसभराच्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. गंगाखेड-नांदेड राज्यरस्ता पहाटेपासूनच बंद झाला. पालम तालुक्यात ७ गावांचा संपर्क तुटला. गोदावरीसह जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या सर्वच नद्या काठोकाठ भरून वाहात आहेत.
पाथरी तालुक्यातील रस्तेही वाहून गेले आहेत. पाथरीहून उमरा, तुरा, गुंज हा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला. गुंजच्या पुलावरून पाणी जात असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पिकेही पाण्याखाली गेली आहेत. ढालेगाव, मुदगल हे दोन्ही बंधारे भरले.
अतिवृष्टीमुळे पालम तालुक्यातील धोंडी नदीला पूर आल्याने आरखेड, फळा, सोमेश्वर, घोडा, उमरथडी, सायाळा, पुयनी या सात गावांचा संपर्क मध्यरात्रीपासून तुटला. केरवाडी-मरडसगाव दरम्यान लेंडी नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने गंगाखेड-नांदेड मंगळवारी पहाटेपासून बंद झाला. दोन्ही बाजूंना वाहतूक खोळंबली. मंगळवारी दिवसभर हा रस्ता बंद होता. मागील आठवडय़ातही हा रस्ता बंद होता.
जिल्ह्य़ाच्या सर्व तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन कोलमडून पडले आहे. शहरातही सर्व व्यवहार थंडावले आहेत. शाळांसह शासकीय कार्यालयात उपस्थितीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. सुरुवातीला कापूस व सोयाबीन पिकांबद्दल आशावादी असणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या मात्र काळजीने घेरले आहे. सततचा पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. गोदावरी पात्रातील सर्वच बंधारे तुंडुब भरले असून पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्याचे तीन दरवाजे उघडले आहेत. मोठे सिंचन प्रकल्प अजूनही तळालाच आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा