केंद्र व राज्याकडून शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने आधार कार्ड देण्याची योजना प्रस्तावित करण्यात आल्यामुळे आधीच अतिशय धिम्या गतीने सुरू असलेल्या आधार कार्ड नोंदणी मोहिमेचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे शहरात विविध प्रभागांमध्ये आधार कार्ड नोंदणीची मोहीम सुरू असली, तरी हे काम ज्या कंपन्यांना देण्यात आले आहे त्यांच्याकडून ते समाधानकारकरीत्या होत नसल्याच्या तक्रारी सर्व भागांमधून येत आहेत. ज्या तीन कंपन्यांना हे काम दिले आहे त्यांच्याकडे नोंदणीसाठीची पुरेशी यंत्र अद्यापही उपलब्ध झालेली नाहीत. तसेच शहरात जेवढय़ा यंत्रांची गरज आहे त्याच्या तुलनेत निम्मीच यंत्र उपलब्ध झाली आहेत. तसेच नोंदणीचे काम घेतलेल्या एका कंपनीने अद्याप कामच सुरू केलेले नाही. या कंपनीवर कारवाई करून त्यांच्याकडून काम काढून घ्यावे, असेही पत्र महापालिकेने शासनाला पाठवले आहे.
एकीकडे आधार कार्ड नोंदणीचे काम शहरात अतिशय धिम्या गतीने सुरू असताना शहरातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी प्राधान्याने करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने केल्याचे समजते. तसा निर्णय झाल्यास शहरातील किमान ३० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी तातडीने करावी लागेल. केंद्राकडून वा राज्याकडून ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, ती आधार कार्डच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन शासनाकडून केले जात आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची तातडीने नोंदणी करण्यासंबंधीची योजना तयार होत आहे.
या योजनेचे महापालिकेतील प्रमुख, उपायुक्त मंगेश जोशी यांच्याकडे या बाबत विचारणा केली असता, विद्यार्थ्यांची नोंदणी प्राधान्याने करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader