आई राजा उदे, उदेच्या जयघोषात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी १२ वाजता शारदीय नवरात्रोत्सवाला तुळजापुरात घटस्थापनेने प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. के. एम. नागरगोजे घटस्थापनेस यजमान म्हणून उपस्थित होते. मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पूजेचा मान पृथ्वीराज प्रफुल्ल मलबा (कदम) यांना मिळाला. शुक्रवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारामुळे घटस्थापनेचा विधी काहीशा तणावाच्या वातावरणात पार पडला.
सकाळी ११ वाजता मंदिर परिसरात घटकलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पाळीचे पुजारी पृथ्वीराज मलबा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, माजी अध्यक्ष सुधीर कदम आदी उपस्थित होते. मध्यरात्री देवीची मूर्ती सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर विधिवत पूजा व अभिषेक पार पडले. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सकाळी ७ वाजता घाट होताच मोठय़ा प्रमाणावर अभिषेक सुरू झाला. भाविकांनी उत्साहात आई राजा उदे, उदेचा जयघोष करीत पूजा केली व घटस्थापनेच्या दिवशी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ११ वाजता घटे यांनी मानाच्या तीन घटांची विधिवत पूजा करून त्याची विधिवत मिरवणूक काढली. या वेळी महंत तुकोजी बुवा, तहसीलदार शशिकांत कोळी, उपजिल्हाधिकारी प्रशांत सूर्यवंशी, नगराध्यक्षा विद्या गंगणे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप गंगणे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजीत नरहरे, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.
सिंह गाभाऱ्यात आंब्याच्या पानावर काळी माती आणि ज्वारी, गहू, मका, तीळ, जवस, करडई या धान्याची ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी मातेची पूजा केल्यानंतर घटाचे धान्य भाविकांना वाटण्यात आले. घटस्थापनेचे धान्य घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. धान्य मिळाल्यानंतर घरोघरी घटस्थापना झाली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा