सर्जनशीलतेचा उत्सव म्हणजे नवरात्र. धान्यांच्या राशी शेतातून घराकडे येऊ लागतात. भूमातेच्या उदरातून नवे बीज अंकुरण्याची प्रक्रिया माहीत असणाऱ्या कृषी प्रधान शेतकऱ्याने आईचा उदोकार करावा. तिला राजा स्थानी मानून आई राजा, उदो उदो म्हणत घटस्थापनेने नवरात्रास आरंभ होतो. शनिवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रासाठी तुळजापूर व माहूर या दोन्ही पूर्ण शक्तिपीठांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होईल. नऊ दिवसांत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा तुळजापूर येथे मांडल्या जातात. भवानीचे हे रूप पाहण्यासाठी आंध्र, कर्नाटकातून मोठय़ा संख्येने भाविक गर्दी करू लागले आहेत.
आई राजा उदे उदेचा गजर
उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवासाठी घटस्थापनेपूर्वी भवानीज्योत उत्साहात, तसेच आई राजा उदे उदेच्या जयघोषात भवानी मातेच्या गाभाऱ्यातून प्रज्वलित करून नेल्या जात आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने तुळजापुरातील प्रमुख मार्ग गजबजले आहेत.
सांगली, सातारा, सोलापूर, बीदर, गुलबर्गा, बीड, लातूर, भालकी, नांदेड, जालना आदी जिल्ह्यांमधून शेकडो मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्रीपासून भवानीज्योत वाजतगाजत नेण्यास प्रारंभ केला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे हे जत्थे जय भवानी, आई राजा उदे उदेचा जयघोष करीत ढोल, ताशा, हलगीच्या निनादात बेभान होत तुळजाभवानी मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहेत. नगर जिल्ह्यातून भवानीज्योत घेऊन जाण्यासाठी अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. तसेच सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमधून चारचाकी वाहनांतून भवानीज्योत घेऊन जाणारे कार्यकत्रे उत्साहात रवाना होत होते.
तुळजाभवानी मंदिरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तनात असून भवानीज्योत नेण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची कसून तपासणी केली जात आहे. मुख्य गाभाऱ्यातून तुळजाभवानी मातेसमोर असलेल्या दिव्यापासून भवानीज्योत प्रज्वलित करून पुजाऱ्याकडून या भक्तांना कुंकवाचा मळवट भरून बाहेर सोडले जात आहे.
यंदा माहूरचे दर्शन ‘लाईव्ह’
वार्ताहर, नांदेड
नवरात्र महोत्सवाला उद्या प्रारंभ होत असून साडेतीन पीठांपकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनाचा ‘लाईव्ह’ आनंद भाविकांना मिळणार आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून हे लाईव्ह दर्शन होईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. माहूर येथे साडेतीन पीठांपकी एक पूर्णपीठ आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी नवरात्रात दरवर्षी लाखो भाविक येतात. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या येथे मोठी आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. घरबसल्या भाविकांना दर्शनाची सोय व्हावी, यासाठी मंदिराचे संकेतस्थळ तयार केले असून, या माध्यमातून लाईव्ह दर्शन घेता येईल. सुरक्षेचा उपाय म्हणून नवरात्रादरम्यान सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. माहूरसह जिल्ह्याच्या सर्वच भागात नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. पोलीस दफ्तरी तब्बल १ हजार १४९ सार्वत्रिक नवरात्र मंडळांची नोंदणी करण्यात आली. शहरात २१३ मंडळांनी नोंदणी केली असली तरी त्यापेक्षा अधिक सार्वजनिक मंडळातर्फे हा महोत्सव साजरा केला जात आहे.