‘आजचा दिवस माझा’ हा मराठी चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माता संजय छाब्रिया, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखकद्वयींपैकी प्रशांत दळवी, अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेत्री अश्विनी भावे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी ‘लोकसत्ता’ला भेट देऊन चित्रपटाविषयी, प्रमुख भूमिकांविषयी गप्पा केल्या. त्याचा सारांश..
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी
‘नायक’ या हिंदी सिनेमाचा अजिबात संबंध नसलेला हा सिनेमा आहे. आमचा नायक विश्वासराव मोहिते हा मुरब्बी राजकारणी आहे. मुख्यमंत्री म्हणून त्याचे पद धोक्यात आले असताना तो दिल्लीला जाऊन श्रेष्ठींची भेट घेऊन परततो. तोपर्यंत बहुतेक हे मुख्यमंत्री जाणार अशी चर्चा रंगलीय. परंतु, दुपारी मुंबईत विमानतळावर तो उतरतो आणि हेच मुख्यमंत्री राहणार हे सगळ्यांना कळून चुकते या नाटय़मय वळणावर सिनेमा सुरू होतो.   आपल्याला ओळखीचा वाटावा असा हा राजकीय नेता दाखविला आहे. हा राजकीय नेता आता कसा वावरतो हे लक्षात घेऊन तो प्रवाह पटकथेत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या व्यस्त दिनक्रम, राजकारणाच्या धबडग्यात अशा काही घटना घडतात की, आपण नेमके काय करायला हवे, आपल्याकडून काय अपेक्षित आहे, याचा विचार तो करू लागतो. मग एका सामान्य माणसाच्या कामासाठी तो सगळे पणाला लावायचा प्रयत्न करतो. प्रशासन, तो, त्याचा निर्णय, सगळी लोकशाही प्रक्रिया आणि जे आदर्शवत असण्याच्या शक्यता आहेत त्या नेमक्या कशासाठी असतात अशा प्रकारचा संघर्ष आहे. तो म्हणतो म्हणून कामे होतातच असेही नसते. नाही तर मुख्यमंत्र्याच्या एका आदेशावर, एका सहीवर काम झाले असते. पण अडथळे येत राहतात, त्यातून काही गंमत घडते, नाटय़ घडत जाते, सिनेमा घडतो. एका क्षणी सगळ्यांनाच असे जाणवते की असंही होऊ शकतं, हे शक्य आहे, खरे म्हणजे रोजच सर्वसामान्य माणसाची कामे अशा पद्धतीने व्हायला हवीत. तशा पद्धतीने कामे व्हावीत अशी राजकारणाची रचना आहे. पण तसं होतं का नेहमी, तर होत नाही. होऊ शकतं हे सिनेमा सांगतो.
अभिनेता सचिन खेडेकर ऊर्फ विश्वासराव मोहिते
सध्याचे राजकारण पाहिले तर मनापासून ‘विश्वासराव मोहिते’सारखी मुख्यमंत्र्यांची भूमिका करायला हवी असे मनापासून वाटते. याचे कारण असे की आपल्याकडे जनतेमध्ये सध्या असे वातावरण आहे की निवडून दिलेले प्रतिनिधी माझ्यासाठी काम करीत नाहीत, स्वत:साठी काम करताहेत. एक नकारात्मक ‘मूड’ आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिनेमामध्ये सकारात्मक मुख्यमंत्री, जनकल्याणासाठी स्वत:ला झोकून देणारा मुख्यमंत्री, त्या परिस्थितीत, व्यवस्थेत राहून एका सामान्य माणसाचे काम करण्याचा हट्ट धरणारा मुख्यमंत्री अशी व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे हा विरोधाभास भूमिकेतून साकारायला मिळाला, त्याची मजा आली. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा म्हणतात की सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारायला हवी. ‘आजचा दिवस माझा’ हा सिनेमा सकारात्मक आहे, त्या विचाराला मदत करणाराच आहे. त्या दृष्टीने विचार केला तर ‘आजचा दिवस माझा’ हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. माध्यमांची माफी मागून असे म्हणावेसे वाटते की आपल्याकडे अजिबातच काम होत नाही, अशी नकारात्मक प्रसिद्धी खूप होतेय. अगदी अजिबात काहीच काम केले जात नाही असे मांडले जाते. तर सिस्टीममध्ये राहूनच पण ती माणसं मग प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधीही काही तरी बरं करण्याचा प्रयत्न करत असतात, या मुद्दय़ाकडेही कुणी तरी पाहायला हवं ते आम्ही या सिनेमात पाहिलंय.  मुख्यमंत्रिपदावरच्या विश्वासराव मोहिते ही व्यक्तिरेखा म्हणजे २५ वर्षे राजकारणात राहिलेल्या एका मुत्सद्दी कार्यकर्त्यांची गोष्ट सिनेमात आहे. मुख्यमंत्र्याचे एक वाक्य आहे की सचिवालयाचे कॅन्टीन ते सहावा मजला हे सहा मिनिटांचे अंतर पार करायला २८ वर्षे लागली. तर अशा २८ वर्षे राजकारणात असलेल्या मुख्यमंत्र्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असा हा ‘आजचा दिवस माझा’ आहे.
लेखक प्रशांत दळवी
मी, अजित दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी आम्हा तिघांना तीन-चार वर्षांपूर्वी राजकीय चित्रपट करायची इच्छा होती. त्यावेळी अनेक जणांच्या भेटीगाठी घेणे असे प्रयत्न सुरू होते. त्या दरम्यान एक व्यक्ती अशी भेटली की त्या माणसाने चार-पाच मुख्यमंत्री जवळून पाहिलेले होते. या भेटीत अनेक किस्से म्हणण्यापेक्षा प्रकरणे त्याने सांगितली. एका प्रकरणापाशी तो रंगवून सांगता सांगता थांबला. ते प्रकरण ऐकताना आम्हा तिघांनाही जाणवले की, त्यामध्ये घटना एका कालमर्यादेतली होती. पण त्यात सिनेमाची संधी खूप दिसली. एका विशिष्ट राजकीय व्यक्तीवर आम्हाला सिनेमा करायचा नव्हता. तसेच्या तसे प्रकरण घेण्याचा विचारच नव्हता.  हा मुख्यमंत्री राजकीय इच्छाशक्तीचे प्रतीक म्हणून दाखवावा असा विचार आम्ही केला. परंतु, तो मुरब्बी राजकारणी असल्यामुळे सकारात्मक व्यक्तिरेखा दाखवायची असली तरी मग तो सर्रास चांगला, आदर्श राजकारणी आहे असा भाबडेपणा आम्ही केला नाही. तो खरा माणूस वाटावा अशा भूमिकेतून लेखन केले आहे.    
अभिनेत्री अश्विनी भावे
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीविषयी मला आदर आहे. विविध विषय, त्याचा आवाका, त्याची हाताळणी, तो ज्या पद्धतीने करतो त्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. त्याने सांगितले की,  तू अमुक एक भूमिका करावीस तर आपण खात्री बाळगायची असते की, तो आपल्या क्षमतेनुसारच ती भूमिका देतोय. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित दळवी आहेतच, पण प्रशांत दळवीचे लिखाण मला खूप आवडते. एखाद्या व्यक्तिरेखेच्या बारीक बारीक कंगोरे, भावना अतिशय हळुवारपणे मांडण्याचे त्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे. त्यामुळे थोडय़ाच दृश्यांमधून बरंच काही सांगता येतं.  भरपूर दृश्ये तुमच्यावर चित्रित झालेली असली तरी चित्रपट वाईट असेल तर काय उपयोग? म्हणून मुख्यमंत्र्याच्या बायकोची भूमिका कमी लांबीची असूनही स्वीकारली. सचिन खेडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे,  त्याच्यासोबत काम करणे हा एक अनुभव आहे. सचिन विचारांनी मला जवळचा वाटतो. सगळी टीम माझ्या परिचयाची होती, त्यामुळेही काम करायला मजा येते. खरे तर प्रत्येक चित्रपट करताना आपल्याला एक अनुभव मिळतो. जो तुम्हाला समृद्ध करून जातो. हा चित्रपट करताना, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची भूमिका करण्याचा अनुभवही मला बरंच काही देऊन गेला, शिकायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा