भविष्यात हिंगोली जिल्ह्य़ाला चांगले भवितव्य असून महसूल विभागातील रिक्त जागा भरल्या जातील. तसेच बाळापूर तालुक्याची निर्मिती होऊन नवीन होऊ घातलेल्या उपविभागीय कार्यालयावर १५ ऑगस्टला झेंडा फडकेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कळमनुरी येथील नियोजित कार्यक्रम आटोपून महसूलमंत्री हिंगोलीत आमदार भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी आले असता पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकसानीचे सर्वेक्षण करून ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक ऱ्याला आवश्यक निधी दिला जाईल, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्य़ात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे पाणलोट कार्यक्रम राबविता येईल. पाण्याचे नियोजन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
जिल्ह्य़ातील महसूल विभागातील रिक्त जागांविषयी विचारले असता ते म्हणाले की, आखाडा बाळापूर या नवीन तालुक्यासोबतच आमदार सातव यांनी दोन उपविभागीय कार्यालयांची मागणी केली होती. कळमनुरीत उपविभागीय कार्यालय सुरू होऊन तेथे १५ ऑगस्टला झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुका निर्मितीच्या प्रश्नावर ते म्हणाले, आखाडा बाळापूर तालुका निर्मितीबाबतचे सर्व निकष तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाल्याने लवकरच तालुका निर्मितीची घोषणा होईल. सांगलीच्या निवडणुकीबद्दल विचारले असता, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांभाळून वक्तव्य करावे, असे ते म्हणाले. जिल्ह्य़ाला आतापर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. नवीन होऊ घातलेल्या मंत्रिमंडळात हिंगोली जिल्ह्य़ाला प्रतिनिधित्व मिळेल काय असे विचारले असता, भविष्यात हिंगोली जिल्ह्य़ाला चांगले भवितव्य असून महसूल विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी आमदार राजीव सातव, भाऊ पाटील उपस्थित होते.