सोलापूर महापालिकेतील कारभार स्वच्छ व पारदर्शक पध्दतीने करून सामान्य नागरिकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या विरोधात महापालिकेतील सत्ताधारी व हितसंबंधी मंडळींनी सुप्त हालचाली सुरू केल्याच्या निषेधार्थ व गुडेवार यांच्या समर्थनार्थ आम आदमी पार्टीने येत्या सोमवारी, १६ डिसेंबर रोजी महापालिकेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकेकाळी राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेली व सध्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण केलेल्या सोलापूर महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मनमानी कारभार सुरू असून कोणाचा पायपोस कोणात नसल्याच्या पाश्र्वभूमीवर सुदैवाने चंद्रकांत गुडेवार यांच्यासारखा आयुक्त लाभला आहे. त्यांनी अवघ्या चार महिन्यात पालिकेच्या कारभारात लक्षणीय सुधारणा करीत शिस्त व पारदर्शकता आणली आहे. एक आयुक्त मनात आणले तर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून महापालिकेचा गाडा विकासाच्या रूळावर कसा आणू शकतो, याचे गुडेवार हे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहेत. परंतु त्यांच्या या कार्यशैलीमुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळी अस्वस्थ झाली असून गुडेवार यांची कोंडी करण्याचा व त्यांची बदली करण्याचा सुप्त घाट घातला जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी गुडेवार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. बसपाठोपाठ आम आदमी पार्टीही गुडेवार यांच्या बाजूने पुढे आली आहे. गुडेवार यांच्या विरोधातील कथित कटकारस्थानाच्या निषेधार्थ येत्या सोमवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे पक्षाचे शहर कार्यकारिणीचे सदस्य मकरंद चनमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुडेवार यांनी महापालिकेत शिस्त लावताना तेथील भ्रष्टाचार व मनमानीला लगाम घातला आहे. त्यामुळे हितसंबंधीयांचे हित धोक्यात आले असून त्यातूनच आयुक्त गुडेवार यांच्या विरोधात कटकारस्थान रचून त्यांच्या बदलीचा घाट घातला जात असल्याचा आरोप चनमल यांनी केला. यावेळी विद्याधर दोशी, चंदुभाई देढिया, अ‍ॅड. रामभाऊ रिसबूड, एम. जी. बागवान, गुरूराज पोरे, रुद्रप्पा बिराजदार, हुसेन नदाफ आदी उपस्थित होते.
महेश कोठे यांचा ‘यू टर्न’
दरम्यान, महापालिकेत आयुक्त गुडेवार यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून विशेषत: महापालिकेच्या चाव्या अनेक वर्षांपासूुन सांभाळणारे सभागृह नेते महेश कोठे यांनी आयुक्त आम्हाला विश्वासात घेत नाहीत, परस्पर निर्णय घेतात अशा सबबी पुढे करीत नाराजीचा सूर लावला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी चालविल्याच्या चर्चेला पालिका वर्तुळात ऊत आला होता. परंतु त्यामुळे त्यांच्या विरोधात जनक्षोभ वाढण्याची चिन्हे दिसू लागताच कोठे यांना, गुडेवार यांच्या विरोधात आपली कसलीही भूमिका नसल्याचा निर्वाळा द्यावा लागला.
शहर व हद्दवाढ भागात सुरू असलेल्या २१२ कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा मक्ता आयुक्तांनी रद्द केला. हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित होते. तशी माहिती त्यांनी पालिका सभागृहाकडे सादर करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया कोठे यांची व्यक्त करीत नाराजीचा सूर लावला होता. मात्र त्यास आयुक्त गुडेवार यांनी कायद्याच्या भाषेत सडेतोड उत्तर दिल्याने कोठे हे मवाळ झाले. तथापि, आयुक्तांच्या विरोधातील या सुप्त हालचाली सुरू झाल्याची चर्चा जोर धरत असतानाच त्याविरोधात विविध संघटनांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात व आयुक्तांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा दिला. तसेच सामान्य नागरिकात त्याविष़ी संतप्त भावना प्रकट होऊ लागल्याने अखेर कोठे यांना ‘यू टर्न’ घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा