जालना तालुक्यातील खरपुडी येथील बुद्धविहाराच्या जागेसाठी संघर्ष करणाऱ्या विलास अंबादास निकाळजे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्री राजेश टोपे व त्यांचे वडील ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टी व आंबेडकरी जनतेच्या वतीने सोमवारी येथे मोर्चा काढण्यात आला.
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र समन्वयक अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली येथील मस्तगड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. परंतु प्रत्यक्षात भाग्यनगरजवळ आल्यावर मोर्चा टोपे यांच्या निवासस्थानाच्या दिशेने वळला. पोलिसांनी अडविल्यानंतर तेथे रस्त्यातच जवळपास पावणेदोन तास अंजली दमानिया, मृत विलास निकाळजे यांची पत्नी, भाऊ याच्यासह मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. मोर्चेकरी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपविभागीय महसूल अधिकारी सोरमारे, तहसीलदार वळवी यांच्यासह पोलीस अधिकारी तेथे पोहोचले. मोर्चेकरी व अधीक्षक मोहिते यांच्यात या वेळी बरीच चर्चा झाली.
खरपुडी येथील गट क्रमांक १९७ मधील पूर्वीपासून वहीवाटीत असलेली बुद्धविहाराची जागा टोपे यांनी ताब्यात घेतल्याने त्यास विरोध करणाऱ्या विलास निकाळजेला चहातून विष देण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. काही पोलीस अधिकाऱ्यांवरही मोर्चेकऱ्यांच्या वतीने आरोप करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
या नंतर अंजली दमानिया यांनी पत्रकारांना सांगितले, की विलास निकाळजे मृत्यूप्रकरणी टोपेंच्या विरोधात कारवाईसाठी आम्ही आग्रह धरला. परंतु या प्रकरणी चौकशी चालू असून ती संपल्यावर कारवाईबाबत निर्णय होईल, असे पोलीस अधीक्षकांनी आम्हास सांगितले. आमच्या मागणीनुसार पोलिसांकडून तसे लेखी उत्तर देण्याची तयारी त्यांनी दर्शविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांचे लेखी उत्तर आल्यानंतर आम्ही या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचे जालना जिल्हा समन्वयक कैलास फुलारी, गंगाराम मगरे, मयत विलास निकाळजे याची आई, पत्नी, भाऊ यांच्यासह इतरांचा समावेश आंदोलन करणाऱ्यांत होता. प्रारंभी दमानिया यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चास पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. परंतु मोर्चाच्या दिवशी ती देण्यात आली.
आरोप तथ्यहीन – टोपे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांनी त्यांच्यासह पालकमंत्री टोपे यांच्यावर आम आदमी पार्टीच्या वतीने झालेल्या आरोपांचा इन्कार केला. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून या पूर्वीच्या चौकशीतही तसे स्पष्ट झाले आहे. अंजली दमानिया या मुंबईच्या असून या प्रकरणाबद्दल माहिती नसताना त्यांच्याकडून अकारण आरोप होत आहेत. जालना जिल्ह्य़ास त्या ओळखत नाहीत व येथील जनताही त्यांना ओळखत नाही. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप महत्त्व देण्यासारखे नाहीत. आजच्या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आलेले आरोप खोटे आणि कोणतेही तथ्य नसलेले असल्याचे आपण यापूर्वीही स्पष्ट केले असल्याचे अंकुशराव टोपे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader