ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना विरोध करत त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी नागरिकांना माहिती देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठाणे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी बेदम बदडले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारण पुढे करत या पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तीन कार्यकर्त्यांना अटकही केली. त्यामुळे संतापलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, आपच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा बलाचे अधिकारी मारहाण करीत होते, त्या वेळी त्यांच्यासोबत तिकीट दलालही उपस्थित होते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या भूमिकेविषयी आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्राला पडलेला दलालांचा विळखा आणि त्या ठिकाणी सुरू असलेला तिकिटांचा काळाबाजार याविषयी आपच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण केंद्राजवळ मंगळवारपासून जनजागृती मोहीम सुरू केली होती. तिकीट मिळवण्यासाठीच्या योग्य पद्धती कोणत्या, अडचण असल्यास काय करावे, तक्रार कुठे करावी, अशी माहिती देण्यात येत असल्यामुळे रेल्वे तिकीट दलालांचे धाबे दणाणले. यावरून काही दलालांनी कार्यकर्त्यांसोबत बाचाबाचीही केली. तसेच एका दलालाने कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार केली होती. बुधवारी सकाळीही कार्यकर्ते पुन्हा रेल्वे स्थानकात आले आणि त्यांनी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना विरोध करत त्यांचा पर्दापाश करण्यासाठी नागरिकांना माहिती देण्यास सुरुवात केली. त्या वेळी दलालांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असतानाच ठाणे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनीही या मोहिमेस विरोध केला. त्यामुळे आप कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकारामुळे संतापलेल्या अधिकाऱ्यांनी रमेश वर्मा, एस.बी. खत्री आणि उन्मेष बागवे या आपच्या तिघा कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्या वेळी रेल्वे तिकीट दलालही तेथे उपस्थित होते. मारहाणीनंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तिघा कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकाराबाबत माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते ठाणे रेल्वे सुरक्षा बलच्या कार्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. रेल्वे तिकीट दलाल आणि रेल्वे सुरक्षा बल यांचा तिकीट काळाबाजार मिलिभगत असल्याचा आरोप या वेळी आप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीष मेनन यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रेल्वे तिकीट दलालांना विरोध करणाऱ्या ‘आप’ कार्यकर्त्यांना मारहाण
ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना विरोध करत त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी नागरिकांना माहिती देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठाणे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी बेदम बदडले
First published on: 27-02-2014 at 10:04 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap supporters beaten by thane security forces