गोदावरी नदीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सोडले जाणारे गटारीचे पाणी बंद करून नदीचे प्रदूषण थांबवावे, या मागणीसाठी सोमवारी आम आदमी पक्षातर्फे महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाच्या मुद्यावरून आजवर अनेक आंदोलने झाली आहेत. हा विषय न्यायालयात पोहोचला असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, हा विषय सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंडय़ावर आला आहे. या प्रश्नाच्या निराकरणासाठी गोदावरी गटारीकरण विरोधी मंच आणि प्रसिध्द जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यासारख्या सामाजिक संस्था व व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधितांच्या कार्याचे समर्थन करत याच मुद्यावरुन ‘आप’चे संयोजक जितेंद्र भावे, सचिव स्वप्नील घिया आदींच्या नेतृत्वाखाली गोदावरी मोहिमेचा आंदोलनाद्वारे शुभारंभ करण्यात आला. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने गोदावरीची स्थिती बिकट होत चालली आहे. महापालिका व औद्योगिक वसाहतीतून दुषित पाणी नदीपात्रात जावून मिसळते. या शिवाय, निर्माल्य टाकणे, गाडय़ा व कपडे धुण्यामुळे नदी प्रदुषित होत असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. गटारीतील पाण्यावर मल:निस्सारण केंद्रात प्रक्रिया करुन ते शेती वा अन्य कारणांसाठी द्यायला हवे. प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालून ४० मायक्रॉनपेक्षा पातळ पिशवी वापरावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, निर्माल्य कलशांची संख्या वाढवावी, कपडे व गाडय़ा धुण्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. नागरिकांनी गोदापात्रात निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader