जयवंत दळवी यांच्या ‘सारे प्रवासी घडीचे’ या कादंबरीत गावोगावी नाटके घेऊन जाणाऱ्या जीवा शिंगीचे वर्णन आले आहे. आपल्या घराण्यात दशावतारी कला असून आपण आपल्या घराण्यातला दहावा अवतार असे सांगणारा कादंबरीतला जीवा आपल्याला पोट धरून हसवतो आणि अलगद डोळ्यांच्या कडा ओलावून जातो. कोकणातल्या या दशावतारी कलेतील एका कलाकाराच्या आयुष्यावर एक चित्रपट येणार असून त्यात आशुतोष राणा ‘संकासूर’ ही मध्यवर्ती भूमिका करणार आहे. आशुतोष राणा एका नव्या वेशभूषेत दिसणार आहे. या वेशभूषेतील त्याची छायाचित्रे खास ‘रविवार वृत्तांत’च्या वाचकांसाठी!
‘संकासूर’ हा चित्रपट आम्ही केवळ कोकणातली खेडी किंवा कोकणातले दशावतारी डोळ्यांसमोर ठेवून बनवत नाही. तर हे भारतातील ग्रामीण संस्कृतीचे चित्रण आहे. खेडय़ात कशा पद्धतीने व्यवहार चालतात, तेथे माणूस कसा जगत असतो, याचे चित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लेखक आणि दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
या चित्रपटात कोकणात दशावताराच्या खेळाची परंपरा जागी ठेवणाऱ्या एका कलाकाराचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. पावसाळा म्हणजे या कलाकारांच्या आयुष्यातला भाकड काळ. त्यामुळे या ऋतूत आपल्या वडिलांनी शिकवलेली मूर्तीकला जोपासून गणेशमूर्ती तयार करून हा कलाकार जगत असतो. त्याचप्रमाणे तो शेतकरीही आहे. ही भूमिका आशुतोष राणा साकारत आहेत. आशुतोष राणा स्वत लोककलेतून आले आहेत. तसेच त्यांचा चेहरा देशभरातील लोकांना परिचयाचा आहे. त्याचप्रमाणे ते ज्या तीव्रतेने काम करतात, ती तीव्रता आपल्याला या भूमिकेसाठी आवश्यक वाटली, असे मर्गज यांनी सांगितले.
या चित्रपटाचे चित्रिकरण आपल्याला तीनही ऋतूंमध्ये करायचे आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असून हा चित्रपट मे किंवा जून २०१३ मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातील आशुतोष राणांची भूमिका सर्वाचा धक्का देणारी असेल. राणाजींना सर्वानाच उग्र किंवा नकारात्मक भूमिकेत पाहण्याची सवय आहे. मात्र या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला हळुवारपणाचाही स्पर्श आहे, असे मर्गज यांनी स्पष्ट केले.

Story img Loader