‘संघर्ष’सारख्या अत्यंत थरारक चित्रपटातल्या तेवढय़ाच भीतीदायक अभिनयामुळे सर्वाच्याच मनात वेगळीच जागा बनवणारा गुणी अभिनेता आशुतोष राणा आता मराठीत पदार्पण करत आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी अशा अनेक भाषांमधील निवडक चित्रपटांत काम करणाऱ्या आशुतोषने मराठीत पदार्पण करण्यासाठीही ‘सायको-थ्रीलर’ विषय निवडला आहे. या चित्रपटाचे नाव ‘येडा’ असे असून त्यात आशुतोषसह किशोरी शहाणे प्रमुख भूमिकेत असणार आहे.
आतापर्यंत सगळ्यांनी माझे राष्ट्रप्रेम पाहिले आहे, आता माझे मराठी प्रेम पाहण्यासाठी तयार राहा, अशा शब्दांत आशुतोषने या चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले. रेणुकाने (शहाणे) केलेल्या ‘रिटा’ या चित्रपटाद्वारेही आपण मराठीत पदार्पण करू शकलो असतो. मात्र आपल्याला अधिक सशक्त भूमिकेची गरज होती. त्यामुळे आपण ‘येडा’च्या भूमिकेसाठी विचारणा होईपर्यंत थांबलो, असेही आशुतोषने सांगितले. ‘येडा’ हा एक ‘सायको-थ्रीलर’ प्रकारातील चित्रपट असून मराठीत अशा प्रकारचे चित्रपट खूपच कमी तयार होतात. त्यामुळे आपल्याला हे आव्हान होते, असेही त्याने सांगितले.
एखाद्या सामान्य माणसाची विचारशक्ती पराकोटीला जाते, तेव्हा त्यात विकृती निर्माण होते. त्यामुळे तो माणूस वेडा होतो. ‘येडा’ची कथा सर्वसाधारणपणे अशीच असून यात ‘येडा’ची मध्यवर्ती भूमिका आशुतोषने केली आहे. या चित्रपटात आशुतोषसह त्याच्या पत्नीची भूमिका किशोरी शहाणे यांनी केली आहे. त्याचबरोबर सतीश पुळेकर यांनी वसंत नार्वेकर हे पात्र साकारले आहे. त्याचबरोबर प्रज्ञा शास्त्री, रिमा लागू आणि अनिकेत विश्वासराव यांनीही ‘येडा’मध्ये भूमिका साकारल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा