गेल्या ४ दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढल्यामुळे ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे तापमान ५.५ अंशांवर खाली आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वात कमी तापमानाची औराद शहाजनी येथे नोंद होत आहे. नदीकाठच्या या गावाला कायमचा थंडीचा कडाका सहन करावा लागतो. दिवाळीनंतर गेल्या ५ दिवसांपासून औरादकर कडाक्याच्या थंडीने हैराण झाले आहेत. दि. १६ नोव्हेंबरला ६ सेल्सिअस, १७ ला ६ सेल्सिअस, १८, १९ व २० असे ३ दिवस येथे ५.५ सेल्सिअस किमान तापमान होते.
थंडीमुळे रब्बी पिकांसाठी पोषक हवामान तयार होते. हरभरा, ज्वारी व गहू या पिकांना थंड हवामान उपयुक्त ठरते. मात्र, १० अंशापेक्षा तापमान कमी झाले तर त्याचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. शेतक ऱ्यांनी शेतात सायंकाळी व सकाळच्या सुमारास शेकोटय़ा पेटवून हवामानातील तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केले जात आहे. शहर-ग्रामीण भागात लोकांनी स्वेटर, मफलर, कानटोपीचा वापर सुरू केला आहे. लातूर शहरातील गांधी चौकात स्वेटर खरेदीसाठी दिवसभर नागरिकांची स्वेटर विक्रे त्यांकडे गर्दी होत आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास थंडीचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येतही चांगलीच वाढ होत आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा