कोपरगाव पोलिसांचे यश
शिक्षक अपहरण प्रकरण
शिक्षकाच्या केलेल्या अपहरण प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी सहाजणांच्या आंतरराज्य टोळीस जेरबंद करण्यात यश मिळवले. या टोळीने तीन जणांचे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तशी कबुलीही आरोपींनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील शिक्षक सोमनाथ गंभीरे यांचे अपहरण केल्यानंतर या टोळीतील गुंडांनी त्यांचे एटीएम कार्ड, मोबाईल संच, घडय़ाळ असा माल हस्तगत केला होता. हे सर्व आरोपी कर्नाटकमधील आहेत.
अटक केलेल्यांमध्ये शरणबसाव्वा सिद्दप्पा डेगीनाहल (वय २३), सिधू शिवरूडाप्पा बसागी (२३), गुरुपाद काशिनाथ बिरादर (१९), नागेश ऊर्फ नागू शेखर ताराणुरा (२४, सर्व रा. गुंडागी, ता. सिंगदी, जि. बिजापूर, कर्नाटक), सुनील लमानी आणि श्रीकांत लमानी (दोघेही सलोनगीतांडा, ता. लिंडी, जि. बिजापूर) यांचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर कोकणठाण चौफुलीलगत शिक्षक सोमनाथ लहानू गंभीरे (राहणार भोजडे) यांचे दि. १७ ऑगस्टला पाच लाख रूपयांच्या खंडणीसाठी या टोळीने अपहरण केले होते. या बाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंखे-ठाकरे व कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर औटे यांनी दिलेली माहिती अशी की, त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी गंभीरे व आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन मिळवून त्यांनी गुन्हात वापरलेली तवेरा गाडी (केए ३७-५९६७) कोणत्या भागात आहे याचा शोध घेतला असता त्यांचा चांदेकसारे-सिन्नर-नाशिक-नगर-मोहोळ असा प्रवास सुरू असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्या, त्या ठिकाणी त्वरित नाकाबंदी करून शोध सुरू असताना या आरोपींनी गंभीरे यांना मोहोळ (सोलापूर) येथील भोसले वस्ती शिवारात सोडून दिले होते. त्याआधी गंभीरे यांच्या एटीएम कार्डाचा वापर करून त्यातील एका आरोपीने अहमदनगर येथून दहा हजार पाचशे रुपये काढून घेतले होते व गंभीरे यांच्याच मोबाईलवरून नातेवाईक व मित्रांना ५ लाख रुपयांची मागणी करत होते.
कोपरगाव पोलिसांचे पोलीस निरीक्षक मधुकर औटे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सोनवणे, पोलीस नाईक एस. यू. गोमसाळे, सागर, जी. बी. मोकाटे, एस. डी. पवार, एस. ससाणे आदींच्या पथकाने २० दिवस कसून तपास केला. आरोपींनी वापरलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ६ जणांना जेरबंद करण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. या आरोपींवर कर्नाटकात खंडणी मागणे, बनावट नोटा प्रकरण, अपहरण आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. अपहरणातच त्यांनी तीन खून केले असल्याची माहिती श्रीमती ठाकरे यांनी दिली. त्या तिघांचे मृतदेह अलमट्टी धरणात त्यांनी टाकून दिले होते. काही दिवसांतच या आरोपींना जेरबंद केल्याने कोपरगाव पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा