कल्याणेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवाला ७०० लिटर उसाच्या रसाने महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे. अभिषेकानंतर भाविकांना उसाच्या रसाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भोसलेकालीन आणि ४०० वर्षे जुने असलेले जागृत देवस्थान म्हणून या परिसरात कल्याणेश्वर मंदिर ओळखले जाते. ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. उसाच्या रसाने अभिषेक यावर्षी प्रथमच करण्यात येणार आहे.
अभिषेकासाठी ३ गाडय़ा उसाची व्यवस्था करण्यात आली असून दोन रसवंती ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत
महादेवाची पिंड उसाच्या रसात ठेवण्यात येणार आहे.यात २५ ते ३० हजार भाविक सहभागी होणार आहे, अशी माहितीही अहीरकर यांनी दिली.
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, खासदार विलास मुत्तेमवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, महापौर अनिल सोले, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, दीनानाथ पडोळे, माजी आमदार सतीश चतुर्वेदी आदी उपस्थित राहणार आहेत.
उपाध्यक्ष अजय कामनानी, सचिव अ‍ॅड. किशोरकांत सोनी, सहसचिव सनद गुप्ता कोषाध्यक्ष गुणवंत पाटील आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.