ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा येथील २५ वर्षांच्या तरुणीने कुख्यात गुंड अबू सालेम याच्याशी लग्न करण्याच्या परवानगीसाठी गेल्याच आठवडय़ात विशेष ‘टाडा’ न्यायालयात धाव घेतली होती. एवढेच नव्हे तर ही परवानगी नाकारली गेल्यास आत्महत्या करण्याची धमकीही तिने दिली होती. सालेमनेही आपण या तरुणीशी लग्न करण्यास तयार असून लग्नास परवानगी मागताना ते लवकरात लवकर लावून देण्याची विनंती सोमवारी न्यायालयाकडे करून खळबळ उडवून दिली आहे.
आपल्याशी नाव जोडल्यामुळे या तरुणीची बदनामी झाली आहे. त्यामुळे तिचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजात तिला तिची प्रतिष्ठा परत मिळावी याकरिता आपण तिच्याशी लग्न करायला तयार असल्याचे सालेमने अर्जात म्हटले आहे. लवकरात लवकर आमचे लग्न लावून दिले जावे जेणेकरून या तरुणीला सन्मानाने समाजात वावरता येईल, असेही त्यांनी परवानगी मागताना म्हटले आहे. लग्नानंतरची तिची सर्व प्रकारची जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचेही त्याने म्हटले आहे.
पोलिसांनी अबू सालेमशी नाव जोडल्याने नाइलाजास्तव त्याच्याशी लग्न लागत असल्याचा दावा या तरुणीने लग्नाची मागणी करताना केली आहे. सालेम सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. काही महिन्यांपूर्वी लांब पल्ल्याच्या गाडीमध्येच त्याने एका तरुणीशी ‘निकाह’ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ही तरुणी मुंब्रा येथील असून निकालासंदर्भात औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सालेमला मुंबई न्यायालयात आणावे, अशी विनंती तिने न्यायालयाकडे केली होती. तसेच आपली ही विनंती मान्य केली गेली नाही तर आत्महत्या करण्याची धमकीही तिने दिली होती.
सालेमसोबतच्या ‘निकाहा’च्या वृत्तासाठी पोलीस जबाबदार असून त्यांनी आपले बनावट छायाचित्र तयार करून प्रसिद्ध केल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकारामुळे माझे नातेवाईक माझ्यापासून दुरावले आहेत. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे माझ्याशी आता कुणीही लग्न करण्यास तयार होणार नाही. त्यामुळे सालेमसोबतच लग्न करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली होती.

Story img Loader