मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘बेस्ट’ची वातानुकुलित सेवा दिवसेंदिवस ‘थंड’ पडत चालली आहे. या वातानुकुलित बसगाडय़ांचे उत्पन्न आणि त्या बसगाडय़ांवर होणारा खर्च यात तब्बल ९३ कोटींची तफावत असल्याचे समोर आले आहे. ही तूट अनेक कारणांमुळे होत असली, तरी प्रामुख्याने नादुरुस्त बसगाडय़ा, चुकीची मार्गआखणी याचा फटका ‘बेस्ट’ला बसत आहे. मुंबईत एकूण २२ मार्गावर ‘बेस्ट’च्या २९० वातानुकुलित बसेस धावतात. या सर्व गाडय़ा सिंगल डेकर असून यापैकी फक्त ६ गाडय़ा डिझेलवर धावतात. तर इतर गाडय़ांसाठी सीएनजी यंत्रणा बसवण्यात आली आहे. ‘बेस्ट’च्या एसी बस मार्गाची आखणी करताना ‘बेस्ट’ने लांब पल्ल्याचा विचार केला आहे. त्यामुळे मंत्रालय किंवा बॅक बे आगार ते गोरेगाव, ठाणे, मीरारोड अशा मार्गावर या गाडय़ा जातात. तर अनेक गाडय़ा बोरिवली ते वाशी, बेलापूर, ठाणे-बोरिवली या मार्गावरही धावतात. या वातानुकुलित सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मात्र थंडाच आहे. वातानुकुलित बसमधून वाहतूक कोंडीतून प्रवास करण्यापेक्षा अनेक जण त्यापेक्षा जलद असलेल्या रेल्वेचा अवलंब करतात. वातानुकुलित बसगाडय़ांपैकी काही मार्गावरील गाडय़ा उड्डाणपुल घेत नसल्यानेही अनेक प्रवासी नाराज आहेत. त्यामुळे या सेवांद्वारे मिळणारे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
२०१२-१३ या गेल्या आर्थिक वर्षांत वातानुकुलित बसगाडय़ांच्या मार्गाचा आर्थिक लेखाजोगा फारसा चांगला नाही. या एका वर्षांत वातानुकुलित गाडय़ांच्या सेवांमधून ‘बेस्ट’ला एकूण ५९ कोटी, ३४ लाख, २२ हजार ५१२ रुपये एवढे उत्पन्न मिळाले. तर या गाडय़ांवरील खर्च १५२ कोटी, ५१ लाख, ४४ हजार १२० रुपये एवढा प्रचंड होता. म्हणजेच या सेवांना ९३ कोटी १७ लाख २१ हजार ६०८ रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
नेमका खर्च कशासाठी?
ल्ल बसगाडय़ांमध्ये सर्वात जास्त खर्च हा इंधनावर होते. ‘बेस्ट’च्या बसगाडय़ांना सध्या बाहेरच्या पंपांवरूनच इंधन भरावे लागत आहे. त्यामुळे त्यांना बाजारभाव द्यावा लागतो.
ल्ल प्रत्येक बसगाडीवर पाळीने दोन चालक, दोन वाहक असतात. त्यांचा महिन्याचा पगारही या खर्चात पकडला जातो.
ल्ल एखाद्या बसची देखभाल करायला किमान चार मेकॅनिक, एक अभियंता असा ताफा लागतो. त्यांचे पगार, बसच्या देखभालीचा खर्च हा खर्चदेखील यात पकडला जातो.