प्राथमिक शिक्षणाधिकारी सोमेश्वर नेताम यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरा धडकलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने घेतलेल्या झडतीत ४७ लाखांहून अधिक रोख रक्कम सापडली. या कारवाईने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांनी या कारवाईवर समाधानही व्यक्त केले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक निशीथ मिश्र व प्रभारी अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारनंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक विशेष न्यायालयात जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. न्यायालयाने झडती घेण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता अत्यंत गोपनीयरित्या झडती कारवाईचे नियोजन करण्यात आले. सायंकाळनंतर गोंदिया येथून उपअधीक्षक दीपक साखरे यांच्यासह पथकाला पाचारण करण्यात आले. मिश्र व पुरंदरे यांच्या नेतृत्वाखालील या विशेष पथकांनी रात्री उशिरा कोराडी मार्गावरील एका बहुमजली इमारतीमधील नेताम यांच्या सदनिकेवर छापा घातला आणि झडती सुरू करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत ही कारवाई अव्याहत सुरूच होती. फ्लॅटच्या विविध भागात जागा मिळेल तेथे नोटांची बंडले सापडली. या सर्व रकमेची मोजदाद पहाटे करण्यात आली. एकूण ४७ लाख १२ हजार १०० रुपये नेताम यांच्या निवासस्थानी सापडले. सोने व दागिने सापडले मात्र ते किरकोळ होते. विमा पॉलिसीज, मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे सापडली. रामटेक येथे तीन भूखंड, उमरेडजवळील वडद, कालडोंगरी, कळमेश्वरजवळील खैरी या तीन ठिकाणी शेती असल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी व तपासणी सुरू करण्यात आली. त्यांची इतर कुठे स्थावर मालमत्ता आहे काय, यासंबंधी माहिती घेतली जात आहे.
मुळात सोमेश्वर नेताम यांच्या ‘कार्यशैली’ची माहिती भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला दोन महिन्यांपासून मिळत होती. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा त्यांनी सपाटा लावला होता. निलंबन, चौकशी आदींबाबत संबंधितांना पाचारण करून अशी प्रकरणे वेगाने ‘मार्गस्थ’ लावणे सुरू होते, याशिवाय संस्थांची मान्यता आणि इतर दैनंदिनी कामेही ‘वजन’ पडताच तातडीने केली जात असल्याची माहिती मिळत होती. मात्र, लेखी तक्रारीशिवाय कारवाईचे अधिकार नसल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग हतबल झाले होते.
सोमेश्वर नेताम ३१ मार्चला सेवानिवृत्त होणार असल्याने तसेच शनिवार, रविवार व सोमवारी गुढीपाडव्याची सुटी असल्याने शनिवारी सायंकाळीच कामाचा अखेरचा दिवस असल्याने त्यायोगे शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी वेगाने मोठय़ा ‘उलाढाली’ झाल्याचे समजताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक निशीथ मिश्र यांनी तातडीने हालचाल केली. कायदेतज्ज्ञांसोबत कायद्याबाबत चर्चा केल्यानंतर तातडीने न्यायालयातून झडतीची परवानगी घेत कारवाई करण्यात आली. निशीथ मिश्र यांची सीबीआयमध्ये प्रतिनियुक्ती झाली असून ३१ मार्च हा त्यांचा अखेरचा दिवस आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्यांनी जाता जाता ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चे पालन करीत धडक कारवाई केली.
दरम्यान, काल नेताम निवृत्तीच्या सत्कार कार्यक्रमात व्यस्त होते. कार्यक्रमानंतर भोजनाप्रसंगी त्यांना कारवाईची माहिती मिळाल्यानंतर ते घराकडे फिरकलेच नाहीत. अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ असल्याचे ऐकवित होता. रविवारीही ते न फिरकल्याने तो फरार असल्याच्या निष्कर्षांप्रत प्रशासन आले होते. असे असले तरी सोमेश्वर नेताम यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. एवढी रक्कम कशी व कुठून आली तसेच त्यांच्याकडील स्थावर संपत्तीचा शोध घेऊन त्याची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर समाधानकारक माहिती ते देऊ न शकल्यास त्यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी कारवाई केली जाईल, असे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा