राज्यातील नक्षलवादी परिसरासाठी अत्यंत आवश्यक असलेले जीपीएस ट्रॅकर पुरविण्यासाठी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने मागितलेल्या टक्केवारीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितला आहे. हा अहवाल अद्याप न आल्याने ही चौकशी थंडावली आहे. या प्रकरणात ठोस पुरावा नसल्यामुळे संबंधित आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या सामग्रीसाठी महासंचालकांच्या कार्यालयातून निविदा मागविल्या जातात. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत या निविदा उघडल्या जातात आणि कमी दराच्या निविदा स्वीकारल्या जातात. नक्षलवादी परिसरासाठी जीपीएस ट्रॅकर पुरविण्याबाबतची मे. मधुराज इंटरप्राइझेसची निविदा मार्च २०१४ मध्ये मान्य करण्यात आली. निविदा मंजूर होऊनही प्रत्यक्ष कार्यादेश देण्यासाठी १५ दिवस घेण्यात आले. या काळात संबंधित आयपीएस अधिकारी थेट टक्केवारीबाबत विचारणा करीत होता. तो जेवढे टक्केमागत होता, तेवढे शक्य नसल्याने आपण नकार दिला. या काळात संबंधित आयपीएस अधिकाऱ्याने दिल्लीतील एका कंपनीशी वाटाघाटी सुरू केल्या. त्यामुळे आपण टक्केवारीची मागणी मान्य केली. त्यानंतर ३९ दिवसांनंतर कार्यादेश दिले, परंतु पाहिजे तेवढी टक्केवारी न दिल्याने संबंधित आयपीएस अधिकाऱ्याने येनकेनप्रकारेण त्रास देण्यास सुरुवात केली, असे एसीबीकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुराव्यादाखल संबंधित पुरवठादाराने व्हॉटस् अॅपवरील संभाषण सादर केले असले तरी हा पुरावा पुरेसा नसल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. या पुराव्यावरून संबंधित आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करता येणे शक्य नाही, मात्र महासंचालकांकडून लेखी अहवाल आल्यानंतरच संबंधित आयपीएस अधिकाऱ्याविरोधात पुढील कारवाई काय करायची हे निश्चित होणार असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा