सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी एखाद्या बसस्टॉपवर उभे असताना तुमच्या बाजूच्या एखाद्या माणसाने अचानक एखाद्या गाडीला हात केला, ती गाडी थांबली आणि तो माणूस त्या गाडीत बसून प्रवासाला रवाना झाला, तर चक्रावून जाऊ नका! ‘असेल गाडीवाला त्याच्या ओळखीचा. आपल्याला काय, शेवटी बसच्याच रांगेत उभे राहायचे आहे,’ असे विचारही मनात आणू नका! कारण सध्या मुंबईत ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ हे सूत्र सरसकट सगळ्याच महत्त्वाच्या रस्त्यांवर चालू आहे. या ‘थांबणाऱ्या’ गाडय़ांमध्ये खासगी गाडय़ांपेक्षाही कॉल सेंटर्सच्या गाडय़ांचे प्रमाण जास्त असल्याचेही चित्र आहे.
सध्या नवी मुंबई, पश्चिम उपनगरे, साकीनाका, पवई-हिरानंदानी या ठिकाणी अनेक ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे पसरले आहे. या कंपन्यांचे कर्मचारी डोंबिवली, बोरिवली, ठाणे अशा कानाकोपऱ्यांतून येतात. त्यांना घरी सोडण्यासाठी या कंपन्या गाडय़ांचा बंदोबस्त करतात. गोरेगाव किंवा साकीनाका येथून कर्मचाऱ्याला डोंबिवलीला सोडायला गेलेली गाडी पुन्हा कंपनीत परतताना रिकामीच असते. मग या गाडीचे चालक बसस्टॉपवरच्या प्रवाशांना विचारणा करतात.
याआधी अशा प्रकारच्या ‘लिफ्ट’ला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र बसमध्ये वाढलेली गर्दी आणि वाहतूक कोंडी यांचा विचार करता प्रवासी सर्रास ही ‘कार सेवा’ स्वीकारू लागले आहेत. महापे किंवा घणसोलीहून बोरिवलीपर्यंत ५० रुपयांत हे चालक सोडतात. त्याशिवाय छोटय़ा छोटय़ा अंतरासाठीही १०-२० रुपये आकारले जातात. तर गोरेगाव ते ठाण्यापर्यंतही ५० रुपयांत येता येते. या मार्गावरील एसी बसचा तिकीट दर ९० ते १०० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे प्रवाशांना हा गाडीचा प्रवास नक्कीच सुखाचा वाटतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा