मनमाड-येवला रेल्वेमार्गावर नगरचौकीजवळ ट्रॅक्टर आणि नवी दिल्ली-बंगलोर कर्नाटक एक्स्प्रेस यांच्यतील धडक चालकाच्या प्रसंगावधानाने टळली. यामुळे कर्नाटक एक्स्प्रेसला दहा मिनिटे उशीर झाला.
मनमाड येथील रेल्वे बंधाऱ्याचा गाळ उपसण्याचे काम सध्या सुरू असून शेतकऱ्यांनी गाळ मोफत घेऊन जाण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसापासून शेतकरी स्वखर्चाने हा गाळ उपसून ट्रॅक्टरमधून वाहून नेत आहेत. दुपारी अशाच प्रकारे शेतकरी नगरचौकी परिसरातून गाळ घेऊन जात असताना रेल्वेद्वार बंद होते. दिल्लीहून बंगलोरकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसमुळे ते बंद करण्यात आले होते. रेल्वेद्वार बंद असल्याने शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर रेल्वेद्वारजवळच उभे केले होते. त्यावेळी एका ट्रॅक्टरने पुढे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यामुळे पहिला ट्रॅक्टर चालक नसतानाही सुरू होऊन रेल्वेव्दारवर धडकला. कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी गाडी तत्काळ थांबवली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ट्रॅक्टर बाजूला केला. तब्बल दहा मिनिटे उशिराने कर्नाटक एक्स्प्रेस रवाना झाली.
या प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर व दोन शेतकऱ्यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. वरिष्ठांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा