अमरावती-परतवाडा मार्गावर नवसारीनजीक एस.टी. मिनीबस आणि स्कूल व्हॅनच्या धडकेत ४ शाळकरी मुले ठार, तर १० जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांना शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
उत्कर्ष प्रदीप निर्मळ (१०), ओम आशीष पवार (४), रोहित सतीश कुकडे (५, सर्व रा. वलगाव), तसेच सुजल गिरीश देशमुख (७, रा. खारतळेगाव) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये राजेश सुधीर कुकडे (४, हातुर्णा), दर्शन प्रवीण नेवारे (११, वलगाव), नैतिक राजू मडावी (५, कामुंजा), दिनेश नीलेश मानकर (५, कुंड सर्जापूर), सार्थक प्रवीण पंचारिया (४, वलगाव), हर्षद सचिन इंगोले (५, कुंड सर्जापूर), शंतनू संदीप निर्मळ (८, वलगाव), रुद्रेश राजेश धोत्रे (५, वलगाव), प्रतीक दत्तराव नंदेश्वर (५, वलगाव), दर्शन मनीष मानकर (५, कुंड सर्जापूर) यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी अरुणोदय इंग्लिश स्कूल आणि पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारे आहेत.
परतवाडा मार्गावर अकोली वळण रस्त्याला जोडणाऱ्या चौकात हा अपघात घडला. वलगाव, कुंड सर्जापूर आणि खारतळेगाव येथील शाळकरी मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या एम.एच.२० / ई १२८१ क्रमांकाच्या स्कूल व्हॅनला परतवाडय़ाहून अमरावतीकडे येत असलेल्या एम.एच. ०७ / सी ७९५८ क्रमांकाच्या मिनीबसने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, स्कूल व्हॅनचा मागील भाग चक्काचूर झाला आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पन्नास फुटापर्यंत घासत गेली. अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच, तर एका विद्यार्थी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
व्हॅनचालक अमोल खरे (रा. वलगाव) आणि एस.टी. बसचालक प्रदीप महल्ले (रा. परतवाडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने एस.टी. बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. बसमध्ये तुरळक प्रवासी होते. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. नंतर त्यांच्या पालकांनी त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये हलवले.
अमरावतीजवळ अपघातामधील २ जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक
अमरावती-परतवाडा मार्गावर नवसारीनजीक एस.टी. मिनीबस आणि स्कूल व्हॅनच्या धडकेत ४ शाळकरी मुले ठार, तर १० जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात घडला.
First published on: 28-11-2012 at 01:12 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident case in amravati two students is in danger